ड्रग्जवर नियंत्रणासाठी बेळगावात विशेष शिबिर; श्री श्री रविशंकर यांची घोषणा | पुढारी

ड्रग्जवर नियंत्रणासाठी बेळगावात विशेष शिबिर; श्री श्री रविशंकर यांची घोषणा

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : युवकामध्ये ड्रग्ज, गांजाची वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठी बेळगावात सहा महिन्यांचे विशेष ध्यानधारणा शिबिर मोफत भरवू, अशी माहिती योग आणि आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी केली. केएलई संस्थेच्या डॉ. व्ही. डी. पाटील सभागृहात मंगळवारी सकाळी रविशंकर यांनी निमंत्रितांसाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर ते बोलत होते. पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील, नियती फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांच्यासह उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

बेळगावमध्ये ड्रग्ज, गांजाची युवकामध्ये व्यसनाधीनता वाढत आहे, ही कशी रोखता येईल, असा प्रश्न विचारला असता रविशंकर म्हणाले, युवक आनंद शोधण्यासाठी व्यसनांकडे वळतात. हा तात्पुरता आनंद घेऊन ते शरीराचे वाटोळे करुन घेतात. प्राणायम आणि ध्यानधारणेत मोठा आणि कायमस्वरुपी आनंद आहे. बेळगावकरांंनी साथ दिली तर इथे मी सहा महिन्यांचे मोफत शिबिर आयोजित करण्यास तयार आहे. हे सहा महिन्याचे शिबिर पूर्ण केल्यास मी खात्री देतो युवक व्यसनापासून कायमस्वरुपी मुक्त होतील.

‘घर घर ध्यान’ पोहचवण्याची गरज आहे. अमेरिका, इग्लंडमध्ये निराशेबरोबर एकाकीपणा वाढत आहे. आत्महत्येेचे प्रमाण वाढत आहे. यासाठी त्यांच्या विद्यापीठात आता ध्यानधारणांची शिबीरे घेतली जातात. ध्यानधारणा केवळ साधू-संतांसाठी नाही, तर ती सर्वांसाठी आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या या देणगीचा आपण पूरेपूर वापर केला पाहिजे. बेळगाव अ‍ॅटोमोबाईल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पाटील यांनी युवकामध्ये वाढत्या हृयदविकारावर मात कशी करता येईल, असा प्रश्न विचारला. हृदयविकार हा मूळतः तणावाचा रोग आहे. यावरही ध्यानधारणा उत्तम उपाय असल्याचे रविशंकर यांनी सांगितले. शिबिरीचे संयोजक महेश केरकर, स्वप्नील आदी उपस्थित होते.

लोकसंख्या कमी करण्यासाठी कोरोना!

चीनने अमेरिकेच्या मदतीने लोकसंख्या कमी करण्यासाठी कृत्रिमरित्या कोरोना व्हायरस निर्माण केला, असा दावा श्री श्री रविशंकर यांनी केला. लोकसंख्येवर नियंत्रण आणण्याचा हा मार्ग नव्हे. कोरोनावर नियंत्रण आणण्याचेही योगात मार्ग आहेत त्यांचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.

Back to top button