बेळगाव : श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत आज सत्संग | पुढारी

बेळगाव : श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत आज सत्संग

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : योग आणि आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत सोमवार, दि. 6 रोजी सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील सीपीएड मैदानावर या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी सुमारे 28 हजार भाविकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगचे संयोजक महेश केरकर यांनी दिली.

जागतिक आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर 14 वर्षांनंतर बेळगावला भेट देत आहेत. त्यांच्या उपस्थितीत येथील क्लब रोडवरील सीपीएड मैदानावर विविध धार्मिक विधी, सत्संग तसेच सार्वजनिक सभा आदींचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी दीड वाजता त्यांचे बेळगावमध्ये आगमन होणार आहे. दुपारी टिळकवाडी येथील आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यालयाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

क्लब रोडवरील सीपीएड मैदानावर सायंकाळी 5.30 ते रात्री 8.30 पर्यंत त्यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सुरुवातीला महारुद्र पूजा, 6 वा. सत्संग, त्यानंतर भजन आणि प्रश्नोत्तरे होणार आहेत. यावेळी श्री श्री रविशंकर मार्गदर्शन करणार आहेत.

श्री श्री रविशंकर यांचा आज बेळगावात मुक्काम

श्री श्री रविशंकर यांचा सोमवारी बेळगावात मुक्काम असणार आहे. त्यानंतर मंगळवारी सकाळी 8.30 ते 11 वाजेपर्यंत केएलई सेंटेनरीमधील डॉ. व्ही. डी. पाटील सभागृहात निमंत्रितांसाठी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमानंतर कपिलेश्वर मंदिरला ते भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी ते सांबरा विमानतळावरुन बंगळूरला रवाना होणार आहेत.

सात हजार वाहनांच्या पार्किंगची सोय

या कार्यक्रमासाठी 80 बाय 40 फुटाचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून, 12 बाय 220 फुटाचे रॅम्प करण्यात आले आहे. या ठिकाणी आठ स्क्रिन उभारण्यात आले आहेत. सुमारे सात हजार वाहनांसाठी व्यासपीठाच्या मागे, वनिता महाविद्यालय शेजारी आणि महनीय व्यक्तींसाठी व्यासपीठाशेजारी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तीनशे पोलिसांसह दोनशे स्वयंसेवक आणि 60 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी फिरती स्वच्छतागृहे तैनात करण्यात आली आहेत.

Back to top button