बेळगाव : महापौरपदी पाटील, सोमणाचे की जोशी? आज होणार निवडणूक | पुढारी

बेळगाव : महापौरपदी पाटील, सोमणाचे की जोशी? आज होणार निवडणूक

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणूक झाल्यानंतर तब्बल 17 महिन्यांनी बेळगावकरांना सोमवारी महापौर व उपमहापौर मिळणार आहे. सभागृहात भाजपचे स्पष्ट बहुमत असून भाजपचा पहिला महापौर होण्याचा मान पटकावण्यासाठी नगरसेविका सारिका पाटील, शोभा सोमणाचे आणि वाणी जोशी यांची नावे आघाडीवर आहेत. उपमहापौरपदाच्या लढतीत कोण बाजी मारणार, याकडेही लोकांचे लक्ष लागून आहे.

महापौरपद खुल्या वर्गातील नगरसेविकेसाठी, तर उपमहापौरपद ओबीसी ब वर्गातील नगरसेविकेसाठी राखीव आहे. सोमवारी सकाळी दहापासून निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. दुपारी तीन वाजता प्रादेशिक आयुक्त तथा निवडणूक अधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. त्यासाठी महापालिकेत सर्व तयारी करण्यात आली आहे. अर्जांची छाननी केल्यानंतर हिरेमठ उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार असून त्यानंतर हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यामुळे दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान बेळगावकरांना नवे महापौर आणि उपमहापौर मिळणार आहेत.

महापालिका सभागृहात भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. 58 पैकी 35 नगरसेवक भाजपचे असून पदसिद्ध सात सदस्यांपैकी पाच सदस्य त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे भाजपचे संख्याबळ 40 वर पोहोचले असून सत्ता त्यांच्या ताब्यात राहणार, हे उघड सत्य आहे. भाजपचा पहिला महापौर बनण्यासाठी नगरसेविका सारिका पाटील, शोभा सोमाणाचे, वाणी जोशी आणि दीपाली टोपगी यांची नावे आघाडीवर आहेत. आगामी विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून मराठी मतदारांना खूश करण्यासाठी भाजप मराठा समाजाला महापौरपद देईल असे सांगण्यात येत आहे.

ब्राह्मण समाजातील वाणी जोशी यांनीही महापौर पदासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केल्याचेही समजते. उमेदवार निवडीबाबत भाजपची आज संध्याकाळी बैठक झाली; पण त्यामध्ये उमेदवाराचे नाव गुपित ठेवण्यात आले. सोमवारी सकाळी अर्ज भरतानाच ते जाहीर करण्याची शक्यता आहे.

उपमहापौरपदासाठी मात्र अद्यापही चुरस दिसून येत आहे. ओबीसी ब महिला उमेदवार फक्त महाराष्ट्र एकीकरण समिती आणि काँग्रेसकडे आहे. त्यामध्ये समितीच्या वैशाली भातकांडे यांनी या पदासाठी जुळवाजवळ केली असल्याचे समजते; पण भाजपच्या गोटात नेहमी हे पद मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न दिसून आले आहेत. खुल्या वर्गातील नगरसेविकांनी ओबीसी ब प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खटाटोप केला आहे. त्यामुळे उपमहापौरपद कुणाला मिळणार, याकडे लोकांचे लक्ष लागून आहे.

विरोधी गटनेते पदासाठी लॉबिंग

महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्यामुळे काँग्रेसने विरोधी गटनेतेपद कोणाला द्यायचे, यावर विचारमंथन सुरू केले आहे. या पदासाठी आमदार सतीश जारकीहोळी आणि शहर काँग्रेस अध्यक्ष राजू सेठ यांची बैठक झाली. या दोन्ही नेत्यांच्या गटाकडून तिघांची नावे चर्चेत आहेत. मुजम्मील डोणी, बाबाजान मतवाले आणि शकील संगोळी हे विरोधी गटनेतेपद मिळवण्यासाठी आग्रही आहेत.

Back to top button