बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी न्यायालयीन कामकाजाला गती येण्यासाठी आपण लवकरच दिल्ली येथे वकिलांशी चर्चा करणार आहे, अशी ग्वाही माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी म. ए. समितीच्या शिष्टमंडळाला दिली.
कोल्हापूर येथे कार्यक्रमासाठी पवार शनिवारी (दि. 28) आलेे होते. त्यावेळी मध्यवर्ती समिती शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वकिलांशी सविस्तर चर्चा करावी, अशी विनंती केली. त्यावर पवार यांनी आपण दिल्लीत वकिलांशी सविस्तर चर्चा करू. शिवाय मुख्यमंत्री शिंदे यांच्याशीही बोलणी करून पुढील रणनीती ठरवण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी मध्यवर्ती समिती खजिनदार प्रकाश मरगाळे, अॅड. एम.जी. पाटील, दत्ता उघाडे, विकास कलघटगी, एपीएमसी माजी सदस्य महेश जुवेकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात आणखी एक साक्षीदार देण्याबाबत वकिलांत चर्चा आहे. त्याबाबत समिती शिष्टमंडळाने पवार यांना माहिती दिली. पवार यांनी याबाबत चौकशी करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. तर समिती शिष्टमंडळाने दै. 'पुढारी'ने प्रसिद्ध केलेला कर्नाटक सरकार वकिलांवर खर्च करत असलेल्या निधीबाबतचा सविस्तर वृत्तांत दाखवला. अशाप्रकारे वेगाने काम करण्यात यावे, अशी विनंती केली.