कर्नाटकला योग साक्षर राज्य बनविण्याचे उद्दिष्ट : जिल्हाधिकारी नितेश पाटील | पुढारी

कर्नाटकला योग साक्षर राज्य बनविण्याचे उद्दिष्ट : जिल्हाधिकारी नितेश पाटील

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  योगाथॉन उपक्रमाची गिनिज बुकमध्ये नोंद करण्यास मदत व्हावी. यासाठी राज्यभर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याध्ये राज्यभरातील १० लाखांपेक्षा अधिकजण सहभागी झाले आहेत. योगामुळे निरोगी व आनंदी जीवन जगण्यास मदत होणार आहे. कर्नाटकाला देशातील पहिले योगसाक्षर राज्य करण्याचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.

येथील सुवर्णविधान सौधच्या आवारात रविवारी योगाथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. तसेच गोल्फ मैदान येथेही हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, युवा सबलीकरण, क्रीडा खाते आयुष्य खाते, एनसीसी, एनएसएस तसेच विविध योग संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या हस्ते रोपट्यांना पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

४५ मिनिटे सादर करण्यात आलेल्या योगथॉन कार्यक्रमात विविध शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी योगासने
केली. यावेळी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. गोल्फ मैदानावर झालेल्या योगाथॉन कार्यक्रमात आ. अनिल बेनके, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी २५ कर्नाटक बटालियनचे लेफ्टनंट कर्नल नंदकुमार, सुभेदार मेजर हरदेव सिंग, उपजिल्हाधिकारी अशोक दुडगुटी, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे उपसंचालक श्रीशैल कंकणवाडी, कन्नड व संस्कृती खात्याच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री, शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे उपसंचालक बसवराज नलतवाड, जिल्हा योग संयोजक आरती संकेश्वरी आदी उपस्थित होते.

Back to top button