बेळगाव : नितीन गडकरींना धमकी देणारा ताब्यात | पुढारी

बेळगाव : नितीन गडकरींना धमकी देणारा ताब्यात

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणार्‍याची ओळख पटली आहे. जयेश पुजारी (वय 35) असे त्याचे नाव असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. नागपूर येथील गुन्हे विभागाचे पथक दाखल झाले असून, जयेशला ताब्यात घेण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. (Threat calls to Nitin Gadkari)

मंत्री गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात गेलेला फोन बेळगावातील हिंडलगा कारागृहातून गेल्याचे स्पष्ट झाले आणि एकच धावपळ उडाली. मंत्र्यांच्या कार्यालयात गेलेल्या फोनचे लोकेशन हिंडलगा कारागृहातून गेल्याचे स्पष्ट होताच शनिवारी रात्रीच नागपूरचे पोलिस पथक बेळगावात पोहोचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी हिंडलगा कारागृहात जाऊन झाडाझडती घेतली. नेमका फोन कोणी केला, हे लवकर स्पष्ट होत नव्हते. परंतु, अशा मानसिक अवस्‍थेत कारागृहात कोण आहे, याची चाचपणी झाली तेव्हा तो जयेश असल्याच्या संशयावरून चौकशी झाली.

खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप 

जयेश पुजारी याने 2008 मध्ये उप्पीन अंगडी (जि. मंगळूर) येथे एकाचा खून केला होता. या खून प्रकरणी त्याला फाशीची शिक्षा झाली होती. परंतु, त्याने सर्वोच्च न्यायालयाने धाव घेतली. यानंतर त्‍याला ठोठावण्‍यात आलेली  शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित झाली होती. यानंतर  त्‍याची रवानगी म्हैसूर येथील कारागृहात करण्‍यात आली. तेथे कारागृहात अन्य कैद्यांवर दादागिरी करणे, फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी देणे, असे प्रकार करत होता. दीड वर्षापूर्वी येथील हिंडलगा कारागृहात स्थलांतर केले आहे. तेव्हापासून तो येथेही असेच प्रकार करत असल्याचे कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे.

Threat calls to Nitin Gadkari : नागपूरचे पोलिस पथक 

नागपूर येथील आठ जणांचे पोलिस पथक येथील हिंडलगा कारागृहात दाखल झाले आहे. बेळगाव ग्रामीणचे एसीपी एस. व्ही. गिरीश, गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक निंगनगौडा पाटील यांच्या सहकार्याने या पथकाने हिंडलगा कारागृहात जाऊन शनिवारी रात्री संपूर्ण चौकशी केली. यावेळी तो जयेश पुजारी असल्याचे स्पष्ट झाले. थेट केंद्रीय मंत्र्यांना धमकी दिल्याने पोलिस जयेशचा ताबा घेऊन त्याला नागपूरला नेणार आहेत. यासाठीची कायदेशीर प्रक्रिया रविवारी सुरू होती.

चार वर्षांपूर्वी एडीजीपींना धमकी

उचापतीखोर जयेश पुजारी आधीपासूनच फोनाफोनीचे प्रकार करतो. 2018 मध्ये त्याने राज्याचे विद्यमान अतिरिक्त पोलिस महासंचालक अलोककुमार यांना फोन करून धमकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याशी अर्वाच्च भाषेत बोलून धमकीही दिली होती. त्यावेळीही फोनचे लोकेशन तपासले असता ते हिंडलगा कारागृहातून जयेश पुजारी याच्याकडून गेल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हा एपीएमसी पोलिसांत जयेशविरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे.

Threat calls to Nitin Gadkari : फोन आला कोठून ?

फाशी, जन्मठेप यासह अनेक गंभीर प्रकरणातील नामचिन गुंड हिंडलगा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. कारागृहात फोन वापरण्यास निर्बंध आहेत. असे असताना अशा नामचिन गुंडांकडे फोन कसा आला ? याचा तपास पोलिस यंत्रणा करत आहे.

हेही वाचा 

Back to top button