बेळगाव : सीमालढा राजकीय नव्हे, भावनिक : मंत्री दीपक केसरकर | पुढारी

बेळगाव : सीमालढा राजकीय नव्हे, भावनिक : मंत्री दीपक केसरकर

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : सीमालढा राजकीय नाही तर तो भावनिक लढा आहे. हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी संयम पाळणे तेवढेच आवश्यक आहे. संयम पाळला तर आपल्याला केंद्र शासन व न्यायालयाची सहानुभूती मिळू शकते, हे लक्षात घेतले पाहिजे, असे असे सांगून मराठी जनतेचे रक्षण करणे हाच महाराष्ट्राचा धर्म आहे, असे मत महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.

मंत्री केसरकर आपल्या नातलगांच्या खासगी कार्यक्रमासाठी सोमवारी (दि. 9) सकाळी बेळगाव भेटीवर आले असता मध्यवर्ती समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. सीमाभागातील मराठी बांधवांच्या हितासाठी आम्ही पॅकेज तयार करत आहोत. ते पॅकेज आमचे येथील मराठी जनतेवर जेवढे प्रेम आहे तेवढेच मोठे असणार आहे हे निश्तिचत. सीमाभागात शांततेचे सौहार्दपूर्ण वातावरण राहावे, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेवरून महाराष्ट्र व कर्नाटकाच्या प्रत्येकी तीन मंत्र्यांची समिती स्थापना झाली आहे. या समितीच्या माध्यमातून आम्ही राज्यभाषेसह स्थानिक मराठी भाषेचा सरकारी कामकाजात तसेच नाम फलक, दिशादर्शक फलक, सूचना फलक आदींच्या बाबतीत अवलंब केला जावा, यासाठी प्रयत्नशील असणार आहोत. जेणेकरून येथील मराठी बांधवांना थोडा तरी दिलासा मिळू शकतो, असे मंत्री केसरकर म्हणाले.

महाराष्ट्र सरकारच्या परवानगीने कर्नाटक सरकार महाराष्ट्रातील कन्नड शाळांच्या विकासासाठी ज्या योजना आखून निधीची तरतूद करत आहे. त्याप्रमाणे कर्नाटक सरकारनेदेखील महाराष्ट्र शासनाला सीमाभागातील मराठी शाळांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यास परवानगी द्यावी, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेणार आहोत, असे मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.

सीमाभागात मराठी नाटकांसाठी प्रयत्नशील बेळगावसह सीमाभागात महाराष्ट्रातून येणारी मराठी नाटके प्रदर्शित होण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे, ते पूर्वीप्रमाणे वाढावे. त्याचप्रमाणे नाटकांवर जो अतिरिक्त कर लावला जातो तो देखील कमी करण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र खाते निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे बेळगावसह सीमाभागात प्रदर्शित होणार्‍या मराठी नाटकांना करामध्ये सवलत दिली जावी. ही सवलत म्हणजे सीमाभागात मराठी नाटक प्रदर्शित करण्यासाठी जो कर आकारला जातो. त्या कराचा महाराष्ट्र शासनाकडून परतावा केला जावा. या सर्व बाबींसंदर्भात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मी विनंती करणार आहे. नाटकांच्या माध्यमातून बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची विनंतीही केली जाईल, असे ते म्हणाले.

याप्रसंगी मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, तालुका पंचायत माजी सदस्य सुनील अष्टेकर आदी उपस्थित होते.

Back to top button