

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : आपण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगत काहीजण बक्षीस म्हणून ग्रामीण भागात मिक्सर, कुकर वाटत आहेत. परंतु, या वस्तू देताना कार्यकर्ते गुलाल लावलेला नारळ स्पर्श करायला लावत आहेत. याला एका कार्यकर्त्याने आक्षेप घेतला. नारळ पकडून मत देण्याची जी कंडीशन घालत आहात, ती चुकीची आहे, असे खडेबोल या तरुणाने त्या कार्यकर्त्यांना सुनावले. हा व्हिडीओ तसेच अन्य तीन व्हिडीओ व्हायरल होत असून त्याची सर्वत्र चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीचे वेध इच्छुकांना लागले आहेत. यामुळे आवश्यक मतांची बेजमी करण्यासाठी इच्छुक उमेदवार सरसावले आहेत. परंतु, ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते नारळावर हात ठेवून मतदारांकडून मतदानाची शपथ घेत भेटवस्तूंचे वाटप करत आहेत. याची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
तालुक्यातील एका गावी जाऊन काहीजण आपण आमदार हेब्बाळकर यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगून मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. यासाठी एका कार्यकर्त्याकडे असणाऱ्या नारळावर हात ठेवून मतदान करण्याची शपथ घेत आहेत. यावर सदर मतदार आम्ही मागील वेळी आमदारांनाच मत दिले आहे. परंतु नारळावर हात ठेवून शपथ घेणे हा प्रकार योग्य नाही. तुमच्या भेटवस्तूपेक्षा आमचा स्वाभिमान आम्हाला महत्वाचा आहे, असे सुनावताना दिसून येत आहे.
दोन व्हिडीओतील संवाद असा दोघे कार्यकर्ते एका रस्त्यावर थांबलेले आहेत. त्याचा व्हिडिओ बनवताना समोरील तरुण म्हणतो आहे की, साहेब मतं तर आम्ही देतो. नारळ पकडून मत द्यायची जी कंडीशन घालताय ती चुकीची आहे. मागे पण मतदान केलो आहे, नाही म्हणत नाही. पण, नारळ पकडून मत मागणे योग्य नाही. समोरील कार्यकर्ता जबरदस्ती नाही पण गिफ्ट मोठे आहे, तुम्ही आम्हालाच मत टाकणार याची गॅरंटी मागत असल्याचे संवादात आहे. त्यावर हा तरुण स्वाभीमानापेक्षा गिफ्ट मोठे आहे का? ही सरळ सरळ जबरदस्ती झाली. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आमच्या गावाला १६ कोटी दिल्याचे सांगता. मग हा रस्ता असा का, अशी विचारणाही येथील नागरिक करत आहेत. सोशल मीडियावर दिवसभरात चारहून अधिक व्हिडिओ व्हायरल झाले असून याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
मला आश्चर्य याच गोष्टीचे आहे की, मी फार मोठे काम केले आहे, ५० वर्षात घडलेले नाही, ते मी करून दाखवले आहे, असे आ. लक्ष्मी हेब्बाळकर वारंवार सांगत आहेत. मग जर असा विकास केला असेल, तर भेटवस्तू देण्याची गरजच काय? चांगले काम केला असाल तर तुम्हाला कसलीही भीती नसायला पाहिजे. जनतेला जे द्यायचे आहे ते विश्वासाने आणि आपले म्हणून द्या, त्यांना शपथ घ्यायला लावून देणे म्हणजे हा एक करार अन् जनतेवर अविश्वास दाखवल्यासारखे आहे
संजय पाटील, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष, माजी आ. बेळगाव ग्रामीणआमदार लक्ष्मी हेब्बाळकर मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे झाल्याचे सांगत असतात. तर दुसरीकडे मतांसाठी भेटवस्तू देणे, नारळावर हात ठेवून शपथ घेणे आदी प्रकार अयोग्य आहेत. त्यांना पराभव दिसू लागल्याने त्यांच्याकडून असे प्रकार सुरू आहेत.
धनंजय जाधव, अध्यक्ष, भाजप ग्रामीण मंडल
आम्ही महत्त्वाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना भेटवस्तू देत असतो. आता तर आम्ही ग्रामीण उस्तव साजरा करत आहोत. हळदी, कुंकू समारंभ झाल्यानंतर महिलांना भेट वस्तू देत आहोत. ही आमची परंपरा आहे. पण आम्ही शपथ घ्यायला लावतोय, हा विरोधकांचा अपप्रचार आहे. काही अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे असा प्रकार झाला असावा. पण आम्ही सर्वांचा आदर करतो.
-लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार, बेळगाव ग्रामीणकुकर, मिक्सर देऊन मराठी माणसांची मते खरेदी करण्याचा प्रकार याआधीही झाला आहे. पण आता मराठी माणूस जागरूक झाला असून अशा प्रकारांना भीक घालणार नाही. स्वाभिमानी मराठी माणूस म. ए. समितीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. साहित्य देऊन मतदानाची शपथ घेणे या प्रकारचा निषेध करावा तितका थोडाच आहे.
– शिवाजी सुंठकर, म. ए. समिती नेते