कोेल्हापुरात लवकरच सीमा परिषद घेऊ : डॉ. प्रतापसिंह जाधव | पुढारी

कोेल्हापुरात लवकरच सीमा परिषद घेऊ : डॉ. प्रतापसिंह जाधव

कोल्हापूर,बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी ठोस कृती करण्याची वेळ आली आहे. आम्ही नेहमीच सीमावासीयांच्या बरोबरीने लढा देत आलो असून लवकरच कोल्हापुरात सीमा परिषद घेऊ, अशी ग्वाही दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी दिली.

कोल्हापूर येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून सोमवारी (दि. 26) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेतली. सीमा चळवळीत आपण स्वतः आणि ‘पुढारी’ने नेहमीच योगदान दिले आहे. सीमावाद ही महाराष्ट्राची दुखरी नस आहे. लवकरच कोल्हापुरात सीमा परिषद घेण्यात येईल. या परिषदेला कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व खासदार, आमदारांना एकत्र आणण्यात येईल. सीमालढ्याला आवश्यक बाबींची पूर्तता करण्यास आपण खंबीर आहोत, अशी ग्वाहीही डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी शिष्टमंडळाला दिली.

सीमावासीयांना जवळचा नेता म्हणून सीमाभाग आपल्याकडे पाहत आहे. या लढ्यातील तुमचे योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यामुळे कर्नाटककडून होणारा अन्याय आणि महाराष्ट्राकडून होणारे दुर्लक्ष या विरोधात आपणच आवाज उठवू शकता. राज्यकर्त्यांना जाब विचारण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंती शिष्टमंडळातील मध्यवर्ती समिती कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केली. भेटीवेळी तालुका समिती सरचिटणीस अ‍ॅड. एम. जी. पाटील, विकास कलघटगी, मराठा महासंघाचे दिलीप पाटील उपस्थित होते.

Back to top button