बेळगाव : सीमाप्रश्न तज्ज्ञ समितीचे सदस्य अ‍ॅड. राम आपटे यांचे निधन | पुढारी

बेळगाव : सीमाप्रश्न तज्ज्ञ समितीचे सदस्य अ‍ॅड. राम आपटे यांचे निधन

बेळगाव: पुढारी वृत्तसेवा : बेळगावमधील सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. राम महादेव आपटे (वय ९७) यांचे आज सकाळी (दि. २३) राणी चन्नमा नगर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. काही महिन्यापासून ते आजारी होते. देहदान केल्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

१९२६ साली जन्मलेले अ‍ॅड. राम आपटे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींचे अनुयायी बनून छोडो भारत चळवळीचे कार्यकर्ते बनले होते. सीमाप्रश्नाच्या कायदेशीर लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. कामगारांच्या पाठीशी त्यांनी कायद्याची ताकत उभी केली होती. वयाच्या ९० वर्षानंतर त्याच तळमळीने ते काम करत होते.

बेळगाव सीमाप्रश्नाच्या वकिलांच्या तज्ज्ञ समितीत ते होते. मागील वर्षी त्यांनी मुंबईत झालेली बेळगाव सीमाप्रश्न तज्ज्ञ समितीच्या बैठकीत त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांची सीमा प्रश्नावरील तळमळ दिसून आली होती. सर्वोच्च न्यायालयात जो सीमाप्रश्नाचा खटला सुरू आहे. त्याचा पाया राम आपटे यांनी घातला. पहिला दावा त्यांनी दाखल केला तेव्हा म. ए. समितीने त्यांना लागणारी रक्कम जमा करून दिली होती. पुढे तो खटला आणि एकंदर जबाबदारी महाराष्ट्राने घेतली आणि आपटे यांचे पैसे परत केले. आजही आपटे यांच्या सल्ल्यानेच सीमाप्रश्नाची खटल्याची कामे चालत होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button