विधिमंडळ अधिवेशनात आज महाराष्ट्रविरोधी ठराव मांडणार : मुख्यमंत्री बोम्मई  | पुढारी

विधिमंडळ अधिवेशनात आज महाराष्ट्रविरोधी ठराव मांडणार : मुख्यमंत्री बोम्मई 

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या 14 डिसेंबरला नवी दिल्लीत बोलावलेली बैठक ही सीमाप्रश्नी नव्हती, तर कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमधील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात होती, असे घूमजाव कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे. विधानसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोम्मई बॅकफूटवर गेले आणि उद्या बुधवारी ‘महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही,’ असा ठराव विधिमंडळात मांडण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. दिल्लीतील बैठकीबाबत बोम्मई रोज एक नवे विधान करत असल्यामुळे त्या बैठकीचे कर्नाटकाला किती गांभीर्य आहे, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी मंगळवारी विधानसभेच्या शून्य प्रहरकाळात विधानसभेचे विरोधी पक्षनेेते सिद्धरामय्या यांनी सीमाप्रश्नी राज्य सरकारची भूमिका काय, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली, शहांच्या बैठकीला जाणे गरजेचे होते का, जायचेच होते तर आधी कर्नाटकात सर्वपक्षीय बैठक का बोलावली नाही, बैठकीला जाणे याचा अर्थ सीमाप्रश्न अजून कायम आहे असे मान्य करणे होत नाही का, असे प्रश्न सिद्धरामय्यांनी विचारले. त्यानंतर काँग्रेससह निजद नेत्यांनीही बोम्मईंना घेरले. प्रश्नांच्या भडिमारामुळे मुख्यमंत्री बोम्मई यांची कोंडी झाली. त्यानंत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी त्यांना सावरून घेतले आणि ‘कर्नाटक महाराष्ट्राला एकही इंच जमीन देणार नाही’, असा प्रस्ताव शासनाकडून दोन्ही सभागृहांत उद्या सादर करण्यात यावा, असा सल्ला दिला. तो बोम्मई यांनी मान्य केला.

सिद्धरामय्या आणि काँग्रेस नेते एच. के. पाटील यांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोम्मई म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावलेली कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बैठक सीमाप्रश्नावर नव्हती. ती दोन्ही राज्यातील सीमेवर उद्भवलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भातील होती. सीमेवर दोन्ही राज्यांनी शांतता बाळगावी, सीमावादाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वा नेत्यांनी कोणतेही प्रक्षोभक निवेदन करु नये; व्यापार, उद्योग वाढीसाठी आणि गुन्हे नियंत्रणासाठी एकमेकांना सहकार्य करावे, आदी सूचना देण्यासाठी होती. ही बैठक केवळ पंधरा मिनिटांसाठी होती. महाराष्ट्रातील कन्नडिगांना मदत करण्यासंदर्भात माझ्या नावाने करण्यात आलेले ट्विट बोगस असल्याचा खुलासाही मी केंद्रीय गृहमंत्र्याकडे केला.

तथापि, बोम्मईंच्या उत्तराने विरोधी पक्षांचे समाधान झाले नाही. सीमाप्रश्न संपला असताना तुम्ही या बैठकीला गेलाच का, विरोधी पक्षांना बैठकीला जाण्यापूर्वी विश्वास का घेतला नाही, असा सवाल सिद्धरामय्या, एच.के.पाटील आदींनी केला. त्यावर बोम्मई म्हणाले, गृहमंत्री शहा यांनी आदल्या रात्री फोन करुन उद्या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली होती. त्यामुळे कोणाशी चर्चा करण्यास वेळ मिळाला नाही. कायदा आणि सुवस्थेसंदर्भात बैठक बोलावण्यात आल्याने जावे लागले.

सगळ्यांनी घेतले सावरून

विरोधकांच्या प्रश्नामुळे मुख्यमंत्री बोम्मई कोंडीत सापडू लागले होते. त्यानंतर सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांनी सीमाप्रश्नी एक होण्याचे ठरवले. सीमाप्रश्न संपला असून, कर्नाटक महाराष्ट्राला एकही इंच जमीन देणार नाही, असे निवेदन दोन्ही सभागृहात सरकारकडून सादर करण्याचा सल्ला विरोधकांनी बोम्मईंना दिला. हा सल्ला मान्य करुन उद्या सरकारतर्फे निवेदन सादर करण्यात येईल, असे आश्वासन बोम्मईंनी दिले.

Back to top button