बेळगाव : रेशनकार्डसाठी लाच मागणारा अन्न निरीक्षक अडचणीत; ऑडिओ क्लीप व्हायरल | पुढारी

बेळगाव : रेशनकार्डसाठी लाच मागणारा अन्न निरीक्षक अडचणीत; ऑडिओ क्लीप व्हायरल

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : रेशनकार्ड देण्यासाठी थेट एका एजंटाकडेच लाच मागणारा कागवाडचा अन्न व नागरी पुरवठा खात्याचा निरीक्षक अडचणीत आला आहे. बीपीएल कोण आणि एपीएल कोण, याचा नेमका घोळ या खात्याचे अधिकारीच घालत असल्याचे दिसून येत असून याची ऑडिओ क्लीप सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे.

जिल्ह्यातील रेशनगाणे अद्याप संपलेले नाही. अनेक श्रीमंत लोकांनी वशिलेबाजीने बीपीएल रेशनकार्डे काढून घेतली आहेत. परंतु, अनेक गरीब व दारिद्य्ररेषेखालील लोकांना अद्याप रेशनकार्डे मिळालेली नाहीत. याबाबत अन्न व नागरी पुरवठा खात्याला विचारले की अद्याप बनावट कार्डांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येते. परंतु, गेल्या पंधरा वर्षांपासून रेशनकार्ड व रेशन वितरणात अद्यापही सुसूत्रतला आलेली नाही, हे उघड गुपीत आहे. अशातच एजंटांना हाताशी धरून अन्न व नागरी पुरवठा खात्यातील काही अधिकारीच रक्कम घेऊन रेशनकार्डे देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कागवाडचे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे निरीक्षक सुनील कट्टी हे एका नदाफ नामक व्यक्तीशी संपर्क साधत चक्क रकमेची मागणी करतानाचा ऑडिओ सध्या जिल्हाभरात व्हायरल झाला आहे. याबाबत निरीक्षक सुनील कट्टी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेतला नाही.

ऑडिओ क्लीपमधील संवाद असा :

अन्न निरीक्षक : नदाफ एकटेच आहात की अन्य कोणी तुमच्यासोबत आहेत.
नदाफ : घरात आहे, बोला ना….!
निरीक्षक : काही नाही, माझ्याकडे तीन अर्ज उरले आहेत, ते मेडिकल पर्पजसाठी अर्ज ठेवून घेतले आहेत. उद्यापासून कोड ऑफ कंडक्ट आहे.
नदाफ : माझ्याकडे चार अर्ज आहेत करून देता का?
निरीक्षक : लगेच पाठवून द्या, डबल आहेत त्याला 2 हजार सिंगल असेल, तर एक हजार
नदाफ : असं करू नका साहेब, बघून घ्या ना प्रत्येक अर्जाला एकेक हजार घेऊन करून द्या, परवा तारदाळे यांनी करून नेले आहे.
निरीक्षक : नाही होत नाही, तुम्हालाच का फोन केलोय मी…, चार अर्ज आहेत तर पाच हजार द्या करून देतो, तुम्ही आमचे आहात म्हणून तुम्हालाच विचारतोय. काँग्रेसला चार मते होतील म्हणून हे करतोय.
नदाफ : साडेचार हजार देतो करून द्या साहेब….
निरीक्षक : असं करू नका… पाच हजार द्या अन् पट्टदिशी अर्ज पाठवून द्या
नदाफ : मग अमाऊंट कधी पाठवू …
निरीक्षक : लगेच पाठवून द्या, फोन पे करा
नदाफ : ऑफिसला जाऊन लगेच अर्ज आणि पैसेही पाठवतो
निरीक्षक : पण, प्रिंट आता लगेच काढू नका, चार-पाच दिवस झाल्यानंतर काढा, कारण कोड ऑफ कंडक्ट लागले की कोणाचे याकडे लक्ष जात नाही.

Back to top button