निपाणीतील जवानाचा उत्तर प्रदेशात अपघाती मृत्यू | पुढारी

निपाणीतील जवानाचा उत्तर प्रदेशात अपघाती मृत्यू

निपाणी, पुढारी वृत्तसेवा : साखरवाडी (निपाणी) येथील भारतीय सैन्य दलातील जवान राजेंद्र पांडुरंग कुंभार (वय ४५) यांचा उत्तर प्रदेश येथील तुंदला रेल्वे स्थानकावर अपघाती मृत्यू झाला. दरम्यान कुंभार यांचा अपघाती मृत्यू झाल्याने शहर व साखरवाडी परिसरावर शोककळा पसरली असून जवान कुंभार यांच्यावर शनिवारी सायंकाळी बसवानगर येथील स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जवान राजेंद्र कुंभार हे गेल्या २२ वर्षापासून भारतीय सैन्य दलात (ज्युनिअर कमांडिंग) अधिकारी पदावर सेवेत होते. गेल्या एक महिन्यापूर्वी त्यांची दिल्ली येथून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे बदली झाली होती. ते पंधरा दिवसाच्या सुट्टीसाठी गुरुवारी आपल्या मूळगावी निपाणीला येत होते. दरम्यान तुंदला रेल्वे स्थानकावर ते रेल्वेतून उतरून दुसरी रेल्वे पकडण्यासाठी जात असताना त्यांचा तोल गेल्याने ते डोक्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी भेट देवुन प्रयाग्रराज सैनिक प्रशासनाला याची माहिती दिली. तर सैनिक प्रशासनाने याबाबतची माहिती कुंभार यांच्या कुटुंबियांना कळविली. त्यानुसार मयत राजेंद्र कुंभार यांचे भाऊ महादेव कुंभार, रवींद्र कुंभार व मित्र सुभाष भादुले हे तातडीने घटनास्थळी रवाना झाले. तत्पूर्वी अपघातस्थळी प्रयागराज सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. तुंदला येथील पोलीस स्थानकात याबाबतची नोंद झाली आहे. दरम्यान, मयत कुंभार यांचे पार्थिव तुंदला येथून शुक्रवारी रात्री दिल्ली येथील सैनिकी रुग्णालयात आणण्यात आले असून ते खास विमानाने शनिवारी पुणे अथवा बेळगाव येथे येणार असून सायंकाळी त्यांच्यावर निपाणी येथे अंत्यसंस्कार येणार आहेत. कुंभार यांच्या मृत्यूची बातमी समजतात निपाणी शहर परिसरासह साखरवाडी परिसरावर शोकाळात पसरली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button