

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : हिरेबागेवाडी टोल नाक्यावर मंगळवारी सहा खासगी वाहनांवर कन्नडिगांनी हल्ला केल्यानंतर कर्नाटक-महाराष्ट्र बससेवेवर परिणाम झाला आहे. बुधवारीसुद्धा खबरदारी घेत दोन्ही राज्यांच्या परिवहन मंडळांनी सीमेपर्यंतच बससेवा सुरू ठेवली आहे. मंगळवारपासून बेळगाव जिल्ह्यात बेळगाव, खानापूर, चिकोडी, निपाणी, संकेश्वर येथे महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या 231 बस आगारांतच थांबून आहेत.
सीमावादावरून बेळगावात वादंग उठल्याने कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही परिवहन मंडळांनी बसेसचे नुकसान टाळण्यासाठी तूर्तास बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुधवारीसुद्धा दोन्ही राज्यांत प्रवास करणार्या प्रवाशांना सीमेवरून प्रवास करण्यासाठी खासगी सेवेवर अवलंबून राहावे लागले. मंगळवारी सकाळी हिरेबागेवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला चढवल्यानंतर कर्नाटक-महाराष्ट्र बससेवेवर परिणाम झाला. त्यामुळे बससेवा सध्या सीमेपर्यंतच सुरू आहे. खबरदारी म्हणून तूर्तास कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा बंद ठेवण्यात आली आहे.