बंगळूर : तीन दहशतवाद्यांना सात वर्षे शिक्षा; घातपातासाठी दरोड्यातून आर्थिक जुळवणी केल्याचे उघड | पुढारी

बंगळूर : तीन दहशतवाद्यांना सात वर्षे शिक्षा; घातपातासाठी दरोड्यातून आर्थिक जुळवणी केल्याचे उघड

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : देशभरात घातपात घडवून आणण्यासाठी आर्थिक जुळवणीकरिता दरोडा घातल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. त्या तिघांनाही सात वर्षे कारावासाची शिक्षा येथील राष्ट्रीय तपास पथकाच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने सुनावली. ते तिघेही जमात उल मुजाहिद्दिन बांगलादेश संघटनेचे सदस्य आहेत.

नजीर शेख ऊर्फ पटला अनास, हबीबुल रेहमान एसके आणि मुशर्रफ हुसेन अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध 2019 आणि 2020 मध्ये विविध दोन खटले दाखल करण्यात आले होते. या दोन्ही प्रकरणांची सुनावणी एनआयएच्या विशेष न्यायालयात झाली. भारतीय दंड विधान, बेकायदा कृत्य नियंत्रण कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यातील विविध कलमांखाली त्यांच्याविरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. बंगळुरातील जमात उल मुजाहिद्दिन बांगलादेशच्या (जीएमबी) अड्ड्यावर एनआयएने छापा घातला होता. त्यावेळी तेथून अनेक वीज उपकरणे, रासायनिक उपकरणे, बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, कंटेनर, सुधारित स्फोटक साधने, डिजिटल कॅमेरे, हस्तलिखित काही कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. आरोपी नजीर शेखला 7 वर्षे कारावास आणि 48 हजार रुपये दंड, हबीबुर रेहमानला 7 वर्षे कारावास आणि 49 हजार रुपये दंड तसेच मुशर्रफ हुसेनला 7 वर्षे कारावास आणि 41 हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने जाहीर केली.

आरोपी हबीबुर हा बुर्द्वान (पश्चिम बंगाल) येथे 2 ऑक्टोबर 2014 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाचा सूत्रधार होता. त्यावेळी एनआयएच्या यादीतील 12 वॉन्टेड दहशतवादी बंगळूरला आले होते. त्यांनी घातपातासाठी आर्थिक जुळवणी सुरु केली होती. यासाठी ते दरोडा घालत होते. 2018 मध्ये त्यांनी बंगळुरातील अत्तीबेलेत दोन ठिकाणी, के. आर. पुरम आणि कोत्तनूर येथील एका घरावर दरोडा घातलाहोता. स्फोटके तयार करण्यासाठी या पैशाचा वापर करण्याचे त्यांनी ठरवले होते. 2019 मध्ये चिक्कबाणावर येथील एका घरात हबीबुरला अटक करण्यात आली होती.

रॉकेट लाँचरचीही चाचणी

या सर्व प्रकरणांसाठी एकत्रित आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. संबंधित चार प्रकरणांची सुनावणी 2019 मध्ये एकत्रितपणे सुरू झाली. संघटनेच्या कारवाया वाढविण्यासाठी आरोपींनी विविध ठिकाणी दरोडा घातला. या पैशाचा वापर त्यांनी बॉम्ब तयार करण्यासाठी केला. रॉकेट लाँचरचीही चाचणी त्यांनी घेतल्याचे तपासातून उघडकीस आले आहे.

Back to top button