बेळगाव : सीमाभागात प्रवाशांचे गुलाब देऊन स्वागत | पुढारी

बेळगाव : सीमाभागात प्रवाशांचे गुलाब देऊन स्वागत

कोगनोळी; पुढारी वृत्तसेवा :  सीमाप्रश्नी वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही राज्यांतील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. बसने प्रवास करणार्‍यांना दिलासा देण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी पुष्प देऊन स्वागत केले.

कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अलोककुमार यांनी सीमाभागाला भेट देऊन कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटक-महाराष्ट्र सीमेनजीक कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातून कर्नाटकात येणार्‍या प्रवाशांचे पुष्प देऊन स्वागत केले. आठ दिवसांमध्ये कर्नाटक-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांनी वेगवेगळी वक्तव्ये केल्याने महाराष्ट्रासह कर्नाटकातील सीमाभागात तणावाचे वातावरण होते. महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य बससेवा बंद ठेवली होती.
आता बससेवा सुरळीत सुरू झाली आहे. पोलिस महासंचालक आलोककुमार म्हणाले, कर्नाटक सीमाभागामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकाने कायद्याचे पालन करून सुव्यवस्था राखावी. सीमाभागातील नागरिकांना व प्रवाशांना पोलिसांचे सहकार्य राहील, असे सांगून अधिकार्‍यांना योग्य सूचनाही केल्या.

पोलिस छावणीचे स्वरूप

मंगळवारी सकाळी कोगनोळी फाटा ते दूधगंगा नदी परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. गतआठवड्यात सीमाभागातील गावांवरून राजकीय वक्तव्यामुळे सीमाभागात वातावरण तापले होते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने सीमाभागाला भेट देऊन आपुलकी आणि स्नेहाचे नाते निर्माण होण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे प्रवाशांसह नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Back to top button