बेळगाव : कडाडला बळीराजाचा आसूड; जीव देऊ, पण जमीन नाही! | पुढारी

बेळगाव : कडाडला बळीराजाचा आसूड; जीव देऊ, पण जमीन नाही!

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  रिंगरोडच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन शेतकर्‍यांच्या मुळावरच घाव घालण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही प्रसंगी जीव देऊ, पण जमीन देणार नाही, असा वज्रनिर्धार शेतकर्‍यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा नेऊन व्यक्त केला. मोर्चात बेळगाव शहर आणि तालुक्यातील शेतकरी, महिला, मुले, नेते, वकील सहभागी झाले होते. मोर्चेकर्‍यांना सामोरे जात जिल्हाधिकार्‍यांनी रिंगरोडसाठी पर्याय काढता येईल का, याबाबत विचार केला जाईल, अशी ग्वाही दिली.

‘रिंगरोडसाठी जमीन देणार नाही’, ‘जय जवान जय किसान’, ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ आदी घोषणा देण्यात येत होत्या. धर्मवीर संभाजी चौक येथून सुरू झालेला मोर्चा कॉलेज रोडमार्गे चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.
बेळगाव तालुक्यातल 32 गावांतील सुपीक जमिनीतून रिंगरोड करण्याची घोषणा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सरकारने केली आहे. त्या विरोधात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने रान उठवले आहे. सोमवारी मोर्चात अनेक गावांतील शेतकर्‍यांनी शेतीकामे बंद ठेवून आपल्या मुलाबाळांसह ट्रॅक्टर आणि टेम्पोमधून सहभागी झाले होते.

साडेबारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. एका हातात चाबूक आणि दुसर्‍या हातात निषेधाचे फलक घेऊन हजारो शेतकरी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चातून चालू लागले. विविध गावांतून आलेल्या शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर आणि टेम्पो सरदार हायस्कूल मैदानावर पार्क केले होते. मोर्चात शेतकरी वर्गाने आणि मुलांनी चाबूक कडाडून सोडला. मोर्चात धनगरी ढोल वादनही होत होते.
सकाळी अकरा वाजल्यापासूनच धर्मवीर संभाजी चौकात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी, अनेक शेतकरी जमले होते. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत होता. दुपारी बारा वाजता तालुक्यातील विविध गावांतून हजारो शेतकरी धर्मवीर संभाजी चौकात एकत्र आले होते.

कोणत्याही कारणास्तव आम्ही आमची सुपीक जमीन देणार नाही. या शेतजमिनीवरच आमचा उदरनिर्वाह चालत असून जमीन गेली तर जगायचे कसे, असा प्रश्न शेतकर्‍यांनी प्रशासनाला विचारला. आमच्या जमिनीतून तुमचा विकास नको. प्रसंगी जीव देऊ पण जमीन देणार नाही, असा निर्धारही शेतकर्‍यांनी व्यक्त केला. मोर्चात शेतकर्‍यांनी विविध गावच्या बॅनरवर नावाचे पिकाऊ जमिनीचे छायाचित्र छापले होते. शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढला. मोर्चासाठी मोठा पोलिस बंदोबस्त होता. डीसीपी रवींद्र गडादी, एसीपी नारायण बरमणी यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी मोर्चावर नजर ठेवून होते. याशिवाय ड्रोन आणि व्हिडीओ कॅमेराद्वारे मोर्चाचे चित्रण करण्यात येत होते.
मोर्चात प्रामुख्याने झाडशहापूर, कडोली, होनगा, बाची, उचगाव, बेळगुंदी, बेन्नाळी, येळ्ळूर, वाघवडे, कलखांब, नंदीहळ्ळी, मुतगा आदी गावांतून शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

धनगरी ढोल आणि मुलांचा चाबूक

शेतकर्‍यांनी चाबूक कडाडून मोर्चाला सुरूवात केली. धनगरी ढोलवादनही सोबतीला होते. लहान मुलांनीही मोर्चा संपेपर्यंत चाबूक कडाडून सोडला. पोलिसही लहान मुलांच्या चाबकांच्या फटकार्‍यांकडे कुतूहलाने पाहत होते.

Back to top button