बेळगाव : वाग्दत्त वधूसाठी नियोजित वराकडून खून; दोघांना अटक

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या खुनाचा छडा गोकाक पोलिसांनी लावला असून, याप्रकरणी दोघांना अटक केली. सोमलिंग सुरेश कुंभार (वय 20, रा. शिंदीकुरबेट, ता. गोकाक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आपल्या वाग्दत्त वधूशी सोशल मीडियाद्वारे संपर्कात असल्याच्या संशयातून नियोजित वराने या तरुणाचा खून केल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याला खुनासाठी तरुणीच्या घरच्यांनी साथ दिली असून, सध्या तरी तिच्या काकासह दोघांना अटक केली आहे. शिवलिंग अरपण्णा तळवार (वय 24, रा. अरभावी, दासर गल्ली) व संतोष चिन्नाप्पा तळवार (वय 39, रा. घटप्रभा, जनता प्लॉट) अशी अटक केलेल्या संशयिताची नावे आहेत.
शिवलिंग याचे एका तरुणीशी लग्न ठरले होते. परंतु, सोमलिंग कुंभार हा या तरुणीसोबत सोशल मिडियावर चॅटिंग तसेच फोन करत असल्याचा संशय तिचा भावी पती शिवलिंग याला होता. याच कारणातून शिवलिंग व तरुणीच्या घरच्यांनी सोमलिंगचा काटा काढण्याचे ठरवले. याचा कोणाला संशय येऊ नये, यासाठी शिवलिंगने दुसर्या दिवशी 9 नोव्हेंबर रोजी मृताचा मोबाईल घेऊन तो घटप्रभा रेल्वेत चढला. तेथून तो मोबाईल घेऊन रायबागला गेला व रेल्वेत मोबाईल ठेवून परत आला. याशिवाय त्याने सोमलिंगचे सोशल मिडियावरील खाते उघडून त्यावर अन्य एका अनोळखी युवतीचा फोटो अपलोड करत पोलिसांच्या तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु, अवघ्या पंधरा दिवसांत याचा पोलिसांनी शोध घेऊन दोघांना अटक केली. या प्रकरणात आणखी तिघे संशयित असून त्यांनाही लवकरच अटक केली जाईल, असे पोलिस प्रमुख डॉ. पाटील यांनी सांगितले.
गोकाकचे निरीक्षक गोपाल राठोड यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक एम. डी घोरी, शहर ठाण्यातील पोलिस विठ्ठल नायक, सुरेश इरगार, मल्लाप्पा गडगिरी, बी. व्ही. नेरली, एस. बी. पुजेरी यांनी या प्रकरणाचा छडा लावला. पोलिस प्रमुखांनी या टीमचे अभिनंदन केले.
गळा आवळून नदीत फेकले
मृत सोमलिंगची आई सरस्वती यांनी आपला मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद घटप्रभा पोलिसांत दिली होती. गोकाकचे निरीक्षक गोपाल राठोड या प्रकरणाचा शोध घेत होते. 12 नोव्हेंबर रोजी जेव्हा सोमलिंगचा मृतदेह शिंगलापूर ब्रीजजवळील पाण्यात सापडला तेव्हा त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. कारण, त्याचे हातपाय बांधून गळा आवळल्याचे व्रण होते. शिवलिंग, मुलीचा नातेवाईक संतोष याच्यासह अन्य तिघांनी 8 नोव्हेंबर रोजी सोमलिंगला संबंधित तरुणीच्या फोनवरून मेसेज करून घटप्रभा येथे बोलावून घेतले. येथे त्याचे हात-पाय बांधून गळा आवळून खून केला. यानंतर त्याचा मृतदेह शिंगलापूर ब्रीजजवळ नेऊन टाकला.