बेळगाव : गुलबर्ग्यात महाराष्ट्राच्या बसवर लाल-पिवळा | पुढारी

बेळगाव : गुलबर्ग्यात महाराष्ट्राच्या बसवर लाल-पिवळा

गुलबर्गा; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या बेताल वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे कर्नाटकातील काही संघटनांना पोटशूळ उठला असून शुक्रवारी (दि. 25) गुलबर्गा जिल्ह्यात महाराष्ट्राच्या एसटी बसवर लाल-पिवळा झेंडा लाऊन ’बेळगाव आमचेच’ असे लिहिलेले कागद चिकटून कंडू शमवून घेतला.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत, सोलापूर, अक्कलकोट हा भाग कर्नाटकाचा आहे. तो आम्ही घेणार आहे, असे बेताल वक्तव्य केले होते. त्यावर महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सर्वपक्षीय नेत्यांनी कर्नाटक सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे पोटशूळ उठलेल्या गुलबर्गा जिल्ह्यातील अफझलपूर तालुक्यात कानडी संघटनेच्या गुंडांनी अक्कलकोट-अफझलपूर ही महाराष्ट्राची एसटी बस अडवली. बसवर चढून लाल-पिवळा झेंडा लावला. समोरच्या काचेवर बेळगाव कालही, आजही आणि उद्याही आमचेच राहणार, असे लिहिलेले कागद चिकटवले. कानडी गुंडांच्या या दादागिरीमुळे महाराष्ट्र एसटी महामंडळाने त्यानंतर कर्नाटकात जाणार्‍या सर्व बससेवा स्थगित केली आहे.

Back to top button