बेळगाव : लॉकअप डेथ प्रकरणी सीआयडी पथक बेळगावात

बेळगाव : लॉकअप डेथ प्रकरणी सीआयडी पथक बेळगावात
Published on
Updated on

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  लॉकअप डेथ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रविवारी दुपारी बंगळूरचे सीआयडी पथक बेळगावात दाखल झाले. त्यांनी प्राथमिक माहिती घेताना वडगाव ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचीही चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती. बसनगौडा यल्लनगौडा पाटील (वय 45, रा. बेल्लद बागेवाडी, ता. हुक्केरी) याचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्याने हे प्रकरण राज्य पातळीवर गांभीर्याने घेतले गेेले आहे. पोलिसांच्या छळवणुकीमुळे आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याची मुलगी रोहिणी पाटील हिने केल्याने याचा तपास तातडीने सीआयडीकडे सोपविण्यात आला. याच्या तपासासाठी रविवारी दुपारीच सीआयडीचे पथक बेळगावात दाखल झाले.

प्राथमिक चौकशी

सीआयडीचे उपअधीक्षक गिरीमल्ला तळकट्टी व त्यांचे सहकारी रविवारी दुपारी वडगाव पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची फाईल मागवून घेतली. यानंतर येथील सीसीटीव्ही, डॉक्टरांचे अहवाल, त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा, त्याला कोणी आणले त्या पोलिसांकडून माहिती, त्याला कोणत्या दवाखान्यात दाखवले, नेमके काय झाले होते, अशा अनेक बाबींची माहिती पथकाने घेतली. ठाण्यात कुठे कुठे सीसीटीव्ही आहेत, त्यामधील फुटेज काय सांगते, याचीही माहिती त्यांनी जमा केली. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने त्यांना अधिकृत कार्यभार सोमवारीच घेता येणार आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे एकत्रित करून यासंबंधीचे पत्र तयार करून अधिकृतरित्या ही फाईल सोमवारी सीआयडीकडे सोपवली जाणार आहे. त्यानंतर याच्या तपासाला गती येणार आहे. परंतु, सध्या तरी त्यांनी प्राथमिक माहिती जमवण्यास प्रारंभ केला आहे.

पोलिसांची चौकशी

हे प्रकरण नेमके कसे घडले, याची चौकशी त्यांनी वडगाव पोलिस ठाण्यातील एकेक पोलिस कॉन्स्टेबलला बोलावून केली. यानंतर सर्वांना एकत्रित करूनही त्यांनी काही माहिती जमविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस ठाण्यातील बहुतांश पोलिस तणावाखाली जाणवत होते. वडगाव ठाण्याबाहेर काही माध्यमांचे छायाचित्रकार गेले होते. परंतु, त्यांना फोटो घेण्यासही मज्जाव करण्यात आला. शिवाय अधिकार्‍यांनीही या घटनेसंबंधीची माहिती देण्यास नकार दिला. तपासानंतरच यासंबंधी बोलू, असे त्यांनी सांगितले.

मृतावर नेमका गुन्हा काय

मृतावर गांजा प्रकरणाचा गुन्हा होता, इतकेच पोलिस सांगत आहेत. परंतु, तो नेमका गुन्हा काय होता, याचा उलगडा झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी चिकोडी येथील एकाला अटक केली होती. तो कच्चा कैदी म्हणून हिंडलगा कारागृहात शिक्षा उपभोगत होता. त्याला जामिनासाठी जेव्हा न्यायालयात आणले व जामीन न मिळाल्याने त्याला पुन्हा कारागृहात नेले. यावेळी तो कारागृहात जाताना फाटकावरील सुरक्षारक्षकांनी त्याची तपासणी केली.

यावेळी जाताना त्याच्या पायात जुने चप्पल होते, तर कारागृहात येताना नवीन चप्पल दिसले. न्यायालयात हे चप्पल याला कोठून मिळाले म्हणून जेव्हा सुरक्षा रक्षकांनी तपास केला तेव्हा त्या चप्पलमध्ये गांजाच्या पुड्या आढळून आल्या. या प्रकरणी हिंडलगा कारागृह प्रशासनाने वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. या कैद्याची जेव्हा चौकशी केली तेव्हा हा गांजा व चप्पल आपल्याला बसनगौडा पाटील याने दिल्याचे सांगितले होते. तीन महिन्यांपूर्वी या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याला अनुसरून वडगाव पोलिस याचा तपास करत होते. त्याच्याच चौकशीसाठी शुक्रवारी त्याला बेळगावला आणत असताना त्याचा मृत्यू झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news