‘हिंदू’ शब्दाचा पर्शियन अर्थ ‘अतिशय घाणेरडा’… जारकीहोळी यांचे हिंदूंच्या भावना दुखावणारे वक्तव्य | पुढारी

‘हिंदू’ शब्दाचा पर्शियन अर्थ ‘अतिशय घाणेरडा’... जारकीहोळी यांचे हिंदूंच्या भावना दुखावणारे वक्तव्य

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  हिंदू धर्म, हा धर्म, तो धर्म, काय आहे हे? हिंदू या शब्दाचा पारसी भाषेतील अर्थ अतिशय घाणेरडा आहे, असे वक्तव्य कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केले आहे. जारकीहोळी यांचे हे वक्तव्य हिंदूंच्या भावना दुखावणारे असल्याची भावना समाजातून उमटत आहे.

गौतमबुद्ध, बसवण्णा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी सुरू केलेल्या जागर महापुरुषांच्या विचारांचा’ या मोहिमेच्या उद्घाटनावेळी ते निपाणीत बोलत होते. स्वतः जारकीहोळी संस्थापक असलेल्या मानव बंधुत्व वेदिकेच्या माध्यमातून ही मोहीम आखण्यात आली आहे.

जारकीहोळी पुढे म्हणाले, हिंदू हा शब्द भारतीय नाहीच. तो पारशी आहे. पारशी म्हणजे कोण तर इराण, उजबेकिस्तान, तुर्कस्तान. हिंदू हा शब्द त्यांनी आणला. मग अशा परक्या लोकांनी आणलेलं तुम्ही एवढे उचलून का धरले आहे? हे परक्यांनी आणलेलं आमच्यावर लादण्यात आले आहे. तुम्ही हिंदू हिंदू म्हणता. पण हिंदू या शब्दाचा पारशी अर्थ तुम्हाला माहीत आहे का? हिंदू शब्दाचा पारशी अर्थ अतिशय घाणेरडा आहे. हे मी म्हणत नाही आताच स्वामींनी तुम्हाला सांगितले.

यावेळी व्यासपीठावर हेब्बाळचे बसवचेतन स्वामी, म्हैसूरचे ज्ञानप्रकाश स्वामी तसेच काँग्रेस नेते उपस्थित होते. ज्ञानप्रकाश स्वामी यानीही हिंदुत्व हा फक्त मतांचा अजेंडा बनला आहे, अशी टीका केली.
सुमारे सव्वा मिनिटांचा सतीश जारकीहोळी यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोमवारी सायंकाळनंतर समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यामुळे या वक्तव्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. निपाणीत भाजप कार्यकर्त्यांनी जारकीहोळी यांच्या विरोधात मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.

Back to top button