बेळगाव : संगमेश्वरनगरात वृद्धेच्या घरात दरोडा … गळा दाबून आठ तोळ्यांचे दागिने लुटले

फाईल फोटो
फाईल फोटो

बेळगाव;  पुढारी वृत्तसेवा :  घरात एकटी असलेली वृद्धा पाहून दरोडेखोराने तिच्या अंगावरील आठ तोळ्यांचे दागिने लुटून नेले. शनिवारी सकाळी 11.15 च्या सुमारास संगमेश्वरनगर येथे ही घटना घडली. या प्रकरणी मालन मारुती जाधव (वय 67, रा. संगमेश्वनगर) यांनी एपीएमसी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

मालन जाधव यांच्या मुलींची लग्ने झाल्याने त्या घरी एकट्याच राहतात. शनिवारी सकाळी नाश्ता केल्यानंतर त्या किचनकट्टा साफ करत होत्या. त्यांच्या घराचा दरवाजा उघडाच होता. ही संधी साधून चोरटा आत घुसला. त्याने पाठीमागून किचनमध्ये जाऊन आजीचे डोळे दाबून धरले. आपल्या ओळखीचेच कोणीतरी असेल, असे समजून कोण आहे ? असा प्रश्न आजींनी केला. परंतु, दरोडेखोराने गळाही दाबला. त्यामुळे हा कोणी तरी वेगळा आहे, हे समजल्यानंतर आजीने आरडाओरड सुरू केली. त्यांच्या बाजूलाच असलेल्या भाडेकरूला त्यांनी जोरात हाक मारली. यावेळी भेदरलेल्या दरोडेखोराने त्यांना ओढत बाथरूममध्ये नेले. तेथे त्यांना खाली पाडून त्यांच्या हातातील दोन दोन पाटल्या व चार बिल्वर असे आठ तोळ्यांचे दागिने काढून घेतले.

माळ वाचली, आजी बेशुद्ध

आजीची हाक ऐकू गेल्याने शेजारचा राजू नामक तरुण धावून गेला. परंतु, या दरोडेखोराने त्यांचा गळा व तोंड जोरात दाबून धरल्याने आजीचा आवाज बाहेर आला नाही. आजी बाथरूममध्ये पडल्या असतील, असा संशय येऊन राजू पुढे गेला नाही. मदतीला आणखी कोणी मिळते का हे पाहण्यासाठी तो बाहेर गेला दरम्यानच्या काळात चोरट्याने मिळालेले सोने घेऊन पलायन केले. त्यामुळे आजीच्या गळ्यातील सोन्याची माळ व अन्य दागिने वाचले.
काही वेळाने राजू इतर शेजार्‍यांना घेऊन आला. त्यानंतर ते घरात गेले. आजी बेशुद्ध आढळल्यानंतर त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. शिवाय पोलिसांना कळवण्यात आले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरोडेखोराचा माग काढण्याचा प्रयत्न केला.

संशयित 25 वर्षांचा तरुण!

ज्याने आजीचे दागिने लुटले, त्याचे वर्णन पोलिसांनी आजीकडून घेतले आहे. सदर तरुण 25 वर्षांचा असून तो उंचापुरा आहे. आजूबाजूला कुठे सीसीटीव्ही चित्रण मिळते का, याची चाचपणीही पोलिसांकडून केली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news