बेळगावसह संपूर्ण सीमाभागात काळा दिन; मराठी भाषिकांनी निषेध फेरीतून दाखवली मराठीची ताकद (फाेटाे, व्हिडीओ) | पुढारी

बेळगावसह संपूर्ण सीमाभागात काळा दिन; मराठी भाषिकांनी निषेध फेरीतून दाखवली मराठीची ताकद (फाेटाे, व्हिडीओ)

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : काळ्यादिनाच्या निषेध फेरीतून मराठी भाषिकांनी आपली ताकद दाखवावी, असे आवाहन माध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले होते. आज (मंगळवार) संभाजी उद्यान मधून हजारोंच्या संख्येने सीमा बांधव या निषेध फेरीत सामील झाले.

बेळगाव शहरासह संपूर्ण सीमाभागात काळा दिन गांभीर्याने पाळण्यात येत आहे. 1956 साली भाषावार प्रांतरचना करण्यात आली व मराठी बहुभाषिक असलेला सीमाभाग तत्कालीन म्हैसूर राज्यात डांबण्यात आला. मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ मराठी भाषिकांकडून 1 नोव्हेंबर हा ‘काळा दिन’ सुतक दिन म्हणून पाळण्यात येतो. मागील दोन वर्षांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निषेध मोर्चा व सायकल फेरी काढण्यात आली नव्हती. मात्र यावर्षी भव्य प्रमाणात निषेध मोर्चा काढून मराठीची ताकद दाखविण्यात येत आहे.

बेळगाव शहरासह तालुक्यातील समितीप्रेमी मराठी भाषिक नागरिक या निषेध फेरीत हजारोंच्या संख्येने सहभागी होण्यासाठी संभाजी उद्यान येथे दाखल झाले. या निषेध फेरीला महाराष्ट्रातून नेते उपस्थित राहणार होते, मात्र कोगनोळी नाक्यावरती त्यांना अडवण्यात आल्यामुळे ते मंगळवारच्या निषेध फेरीत सहभागी होऊ शकले नाहीत. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती शिवसेना, युवा समिती, तालुका युवा आघाडी, महिला आघाडी, विविध युवक मंडळे, संघटनांनी निषेध फेरीत सहभाग घेत निषेध नोंदवला.

सकाळी 9 वाजता संभाजी उद्यानातून निषेध फेरीला सुरवात झाली. शहराच्या विविध भागातून मराठा मंदिरात फेरीची सांगता होणार आहे. त्यानंतर नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. निषेध फेरीमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किनेकर, युवा समितीचे नेते शुभम शेळके, महिला युवा आघाडीच्या नेत्या रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील यांच्यासह हजारो सीमावासीयांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला आहे. मिरवणुकीत काळे झेंडे, भगवे झेंडे, काळे कपडे, दंडाला काळ्या फिती, डोक्यावरती काळा दिन लिहिलेली पांढरी टोपी, महाराष्ट्र एकीकरण समितीचे सिंह सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. काळा दिनाच्या निघालेल्या या निषेध फेरीत बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. या घोषणांनी मिरवणुकीचा मार्ग दणाणून सोडला. या मिरवणुकीत अंबालवृद्धांसह महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

हेही वाचा :  

Back to top button