निपाणी : महाराष्ट्रातून कर्नाटकात गांजाची तस्करी करणारा तेरवाडचा युवक गजाआड | पुढारी

निपाणी : महाराष्ट्रातून कर्नाटकात गांजाची तस्करी करणारा तेरवाडचा युवक गजाआड

निपाणी ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातून कर्नाटकात गांजाची राजरोसपणे तस्करी करणाऱ्या तेरवाड (ता. शिरोळ) येथील संशयित युवकाला निपाणी पोलिसांच्या एलसीबी पथकाने जत्राट- अकोळ मार्गावर रंगेहाथ पकडून अटक केली. अमीर बशीर जमादार (वय 21) असे अटक करण्यात आलेल्या संशयित युवकाचे नाव आहे.

यावेळी पथकाने अमीर याच्याकडून 8 हजार रुपये किंमतीचा 500 ग्रॅम गांजा, एक दुचाकी, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. निपाणी पोलीस सर्कल अंतर्गत सीपीआय संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या एलसीबी (स्थानिक गुन्हे अन्वेषण) पथकाचे कर्मचारी गस्त घालत असताना अमीर जमादार हा अकोळ येथून जत्राटच्या दिशेने दुचाकीवरून वेगात जात असल्याचे दिसून आले.

त्यानुसार पथकाने त्याची दुचाकी थांबवून चौकशी केली असता, त्याच्याजवळील पिशवीत 500 ग्रॅम गांजा आढळून आला. यावेळी अमीर याने आपण गांजाची तस्करी करत असल्याचे सांगितले. त्यानुसार अमीर याच्यावर बसवेश्वर चौक पोलिसात अंमली पदार्थविरोधी कायद्याने गुन्हा दाखल करून त्याच्या जवळून मुद्देमाल जप्त करून त्याला निपाणी न्यायालयपुढे हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याची बेळगावच्या हिंडलगा जेलमध्ये रवानगी केली.

ही कारवाई सीपीआय संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंद कॅरीकट्टी, हवालदार प्रकाश साबोजी, एलसीबी पथकाचे पोलीस कर्मचारी शेखर असोदे, एम.ए.तेरदाळ,श्रीशैल गळतगे,पी.बी.कांबळे, आनंद पांडव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.

विशेष म्हणजे निपाणी पोलिसांनी गेल्या महिन्यात केलेली ही तिसरी कारवाई आहे. त्यामुळे निपाणीसह सीमाभाग हे आता गांजा तस्करीचे प्रमुख केंद्र बनल्याचे स्पष्ट होत चालले आहे.

हेही वाचा :  

Back to top button