

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची मुदत संपली आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातील 254 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी 14 तालुक्यांतून 5 हजार 331 अर्ज ऑनलाईन दाखल झाले आहेत. त्यामुळे अधिकार्यांची निवड प्रक्रियेत कसोटी लागणार आहे.
अंगणवाडी भरतीसाठी हजारो अर्ज दाखल झाल्याने चुरस निर्माण झाली आहे. या भरतीसाठी विशेषत: शेतकरी, विधवा, 60 टक्क्यांहून अधिक दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. संबंधित महिलांचे अर्ज नसल्यास इतर महिलांचा विचार केला जाणार आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमधील 254 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. 16 तालुक्यातून 5 हजार 331 अर्ज ऑनलाईन दाखल झाले
आहेत.
जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. शिवाय सर्व कारभार ऑनलाईन पद्धतीने व्हावा, यासाठी साहाय्यिकांना स्मार्ट फोनचे वितरण करण्यात आले आहे. कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी राष्ट्रीय पोषण अभियान राबविले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. रिक्त असलेल्या अंगणवाड्यांमध्ये मदतनीसची भरती केली जाणार आहे.
जागा कमी अर्ज जास्त आल्याने अंगणवाडी भरतीत चुरस निर्माण झाली आहे. वशिलेबाजी, अर्थिक व्यवहारांना ऊत आला असून प्रत्येकजण आपल्या उमेदवाराला कसे स्थान मिळेल, यासाठी प्रयत्नशील आहे.