‘कटल्या’चे रिंगण हेच बेळगावचे वैशिष्ट्यपूर्ण सीमोल्लंघन

‘कटल्या’चे रिंगण हेच बेळगावचे वैशिष्ट्यपूर्ण सीमोल्लंघन
Published on
Updated on

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर, गोपाळपूर आणि वारीच्या वाटेवर घोड्यांचे रिंगण होते. आषाढी वारीचे ते वैशिष्ट्य. असेच वैशिष्ट्य बेळगावच्या सीमोल्लंघनाचेही आहे. बेळगावात सीमोल्लंघनदिनी कटल्या बैलाचे रिंगण होते अन् ते पाहण्यासाठी हजारो लोक हजर असतात. बुधवारी विजयादशमीला हे रिंगण सायंकाळी 5.30 वाजता ज्योती कॉलेजच्या मैदानावर होणार आहे.

बेळगाव हे मूळ 18 गल्ल्यांचे गाव. पैकी चव्हाट गल्लीला विशेष मान. कारण, तेथे चव्हाटा देवस्थान आहे. कोल्हापूरच्या जोतिबाच्या यात्रेत अग्रस्थानी असणारी सासनकाठी चव्हाट गल्लीतील देवघरातूनच निघते. शंकराचा नंदी ऊर्फ कटल्या हा मूळचा या गल्लीचा. कटल्या या शब्दाचा अर्थ अंगाने मोठा; पण बेळगावचा कटल्या या शब्दाचा अर्थ शिवाचा नंदी असा घेतला जातो, असे माहीतगार सांगतात. विजयादशमीदिवशी कटल्या आणि कोल्हापूरच्या जोतिबाच्या चव्हाट गल्लीतील सासनकाठीची धर्मवीर संभाजी चौकातून मिरवणूक निघते. ती ज्योती कॉलेजच्या मैदानावर पोहोचते. तिथे आधी कटल्याचे रिंगण होते. त्यानंतर कटल्या आपट्याच्या पानांची रास शिंगांनी विसकटतो. त्यानंतर तीच पाने घेऊन बेळगावकर एकमेकांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतात.

चव्हाट गल्लीत बेळगावचे देवघर आहे. या देवघराचे 'देवदादा' म्हणजे पहिले पुजारी. ते ध्यानस्थ बसून ज्योतिर्लिंगाची आराधना करायचे. त्यानंतर काही वर्षांनी पृथ्वीतलावर कसा बदल होत जाणार याचेही भाकीत करायचे. प्रत्येक महादेवाच्या मंदिरात किंवा समोर दगडाचा नंदी असतो; मात्र आपल्या घरासमोर जिवंत नंदी असावा, या कल्पनेतून देवदादांनी बैल पाळण्यास सुरुवात केली. याच नंदी बैलाला 'कटल्या' म्हणून ओळखतात. सुमारे 200 वर्षांपासून बेळगावच्या चव्हाट गल्लीत नंदी बैल ऊर्फ कटल्याची पूजा करण्याची प्रथा आहे. या कटल्याची राहण्याची व्यवस्था याच देवघरात गोठा बांधून करण्यात आली आहे. मात्र, कटल्या या गोठ्यात कधीतरीच येतो. तो बेळगावभर फिरत असतो. ठरावीक घरांमध्ये त्याला चारा पुरवला जातो. ठरावीक वेळेत तो ठरावीक ठिकाणी हजेरी लावतो. कटल्याला कष्टाची कामे लावली जात नाहीत. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कटल्या भक्त मंडळींसमवेत चालत जोतिबाच्या डोंगरावर जातो. जोतिबाच्या डोंगरावर असलेला घोडा व उंट याची भेट कटल्याबरोबर केली जाते. विजयादशमी हा कटल्याचा मानाचा दिवस. कटल्याला सकाळी अंघोळ घातली जाते. त्यानंतर त्याच्या अंगावर झूल घातली जाते. त्याला रंगीत कपड्यांनी सजवले जाते. कटल्याच्या दोन्ही बाजूला ढोल बांधून सासनकाठीसमवेत कटल्याला धर्मवीर संभाजी चौकातून ज्योती कॉलेजच्या मैदानावर नेले जाते. या मैदानावर कटल्या रिंगण घालतो. त्यानंतर तो आपट्याच्या पानांची रास स्वत:हून विसकटून टाकतो. असे करताना तो जमिनीत आपली शिंगे खुपसतो. त्यामुळे मातीही उखडते. ही माती आणि आपट्याची पाने उखडल्यानंतर बेळगावकर तीच पाने एकमेकांना देत 'सोने घ्या सोन्यासारखे राहा' असा संदेश देतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news