बेळगाव : सौंदत्ती यात्रेसाठी धावणार अतिरिक्त 60 बस | पुढारी

बेळगाव : सौंदत्ती यात्रेसाठी धावणार अतिरिक्त 60 बस

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर यल्लमा देवस्थानला जाणार्‍या भाविकांची संख्या अधिक़ असते. त्यामुळे बेळगाव आगारातून थेट सौंदत्ती देवस्थानला बससेवा सोमवारपासून सुरू होणार आहे. कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा यात्रेसाठी बेळगाव बसस्थानकातून जादा बस धावणार आहेत. नवरात्रोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीखातर बेळगाव सौंदती मार्गावर तब्बल 60 अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत. सोमवारपासून ही अतिरिक्त बससेवा सुरू केली जाणार आहे, अशी माहिती परिवहनचे विभागीय नियंत्रण अधिकारी पी. वाय. नाईक यांनी दिली.

नवरात्रोत्सव काळात सौंदती येथील यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांची संख्या अधिक असते. दरम्यान , प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने अतिरिक्त 60 बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी यात्रा विशेष कार्यक्रमांसाठी परिवहनकडून जादा बस सोडल्या जातात. नवरात्रोत्सव काळात प्रवाशांची मागणी वाढल्यास पुन्हा जादा बस सोडण्याचा निर्णयही परिवहनने घेतला आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांत मंदिरे यात्रा जत्रांवर निर्बंध आले होते. त्यामुळे परिवहनला फटका बसला होता. मात्र , यंदा सण – उत्सव पूर्ववत सुरू झाल्याने यात्रांना भाविकांची गर्दी वाढत आहे. सौंदती येथील यात्रेसाठी खानापूर, बेळगावसह गडहिंग्लज, चंदगड, हुक्केरी, चिकोडी तालुक्यांतून जाणार्‍या भाविकांची संख्या मोठी आहे.

मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी 6 पासून रात्री 10 वाजेपर्यंत ही विशेष सेवा उपलब्ध राहणार आहे शिवाय सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी बाहेरील बसस्थानक आगारातून 25 बस मागविण्यात आल्या. ऑनलाईन तिकीट बुकिंगची असून विशेष बससेवा सज्ज करण्यात आली व्यवस्था करण्यात आली आहे. दि. 26 ते 5 ऑक्टोबरपर्यंत विशेष बस धावणार आहेत.

Back to top button