बेळगाव : पूर्वेला लम्पी, पश्चिमेला घोणस अळी; तालुक्यातील शेतकरी आले अडचणीत | पुढारी

बेळगाव : पूर्वेला लम्पी, पश्चिमेला घोणस अळी; तालुक्यातील शेतकरी आले अडचणीत

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  कोरोना, लॉकडाऊननंतर यंदा सावरण्याचा प्रयत्न करणार्‍या तालुक्यातील शेतकर्‍यांच्या अडचणीत पुन्हा भर पडली आहे. तालुक्याच्या पूर्वभागात लम्पी स्किन रोगाने तर पश्चिम भागात घोणस अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

मागील महिनाभरापासून पूर्वभागातील मुतगा, निलजी, बसवण कुडची, बसरीकट्टी आदी भागात जनावरांना लम्पी स्किन रोगाची लागण झाली आहे. याची लागण झाल्याने 7 हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. रोगाची लागण झालेल्या जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागत आहे. दुभत्या जनावरांना याचा अधिक प्रमाणात फटका बसला आहे. परिणामी शेतकरी अडचणीत सापडले असून, त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

पशुसंगोपन खात्याकडून लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. हा चर्मरोग असून, यामध्ये जनावरांचा मृत्यू होत आहे. परिणामी यासाठी रोगप्रतिबंधक लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. शेतकर्‍यांमध्ये जागृती करण्यात येत आहे.
हे संकट आले असतानाच दोन दिवसांपूर्वी पश्चिम भागातील कर्ले येथे घोणस अळी आढळून आली आहे. ही अळी प्रामुख्याने ऊस आणि गवतावर आढळून येते. याचा दंश झाल्यास शरीर बधीर होते. असह्य वेदना होऊन उलट्या होतात. अळी धोकादायक असल्याने शेतकर्‍यांच्या अडचणीत भर पडली आहे.

भरपाईची गरज

महाराष्ट्रात लम्पीचा सर्वाधिक फैलाव झाला आहे. यामध्ये दगावलेल्या जनावरांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्य सरकारने निर्णय घेण्याची गरज आहे. परंतु, याची तीव्रता अधिक प्रमाणात बेळगाव परिसरातच आहे. राज्यात याचा प्रसार कमी आहे. यामुळे भरपाईचा निर्णय घेण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

Back to top button