साईबाबांचा अवतार असल्याचे सांगून दीड कोटींची फसवणूक | पुढारी

साईबाबांचा अवतार असल्याचे सांगून दीड कोटींची फसवणूक

बंगळूर : साईबाबांचा अवतार प्रेम साई असल्याची बतावणी करून लोकांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोल्हापूरच्या सचिन सरगरसह सहाजणांवर बंगळूर शहर पूर्व पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन आकाराम सरगर बंगळुरात आठ महिन्यांपूर्वी आला होता. आपण साईबाबांचा अवतार असून लोकांची संकटे दूर करतो. सर्वांचे भले करतो, अशी बतावणी करून त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चन्‍नपट्टण एम. जी. रोडवरील एका महिलेच्या घरी त्याने आश्रय घेतला. तेथे दररोज पूजा व भजनाचा कार्यक्रम होत होता.

तेथे भाविकांची संख्या वाढत होती. तेथे एक महिला भजनाला येत होती. दर गुरुवारी त्यांच्या फार्म हाऊसवर भजन आयोजित करण्याची इच्छा असल्याचे संशयिताने सांगितले. त्यानुसार महिलेने आपल्या पतीची परवानगी घेतली. तिथे तीन महिने भजन सुरू होते. त्यानंतर एक दिवशी संशयिताने त्या महिलेला ही जागा प्रेम स्वरुपिनी साई सेवा समिती ट्रस्टच्या नावे करण्याची मागणी केली. त्याला महिलेच्या पतीने त्यास नकार दिला.

13 जुलै रोजी डॉ. साईकुमारी, कृष्णय्या व गिरीश विजयेंद्र यांनी शहरात आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमात भाग घेतला. त्यांच्यासह कोल्हापुरातील काहीजण होते. संशयिताला पाहिल्यानंतर तो स्वामी नसल्याचे कोल्हापुरातील काहींनी सांगितले. काही भाविकांनी कोल्हापूरला जाऊन चौकशी केली असता त्याने कोल्हापुरातही काही जणांना फसवल्याचे समजले.

Back to top button