बेळगाव : तीस अभियांत्रिकी महाविद्यालये बनणार ‘सुपर’ | पुढारी

बेळगाव : तीस अभियांत्रिकी महाविद्यालये बनणार ‘सुपर’

बेळगाव;  पुढारी वृत्तसेवा :  रिजनल इकोसिस्टम फॉर टेक्निकल एक्सलन्स (आरईटीई) प्रकल्पाबाबत येत्या 5 वर्षांत राज्यातील 30 अभियांत्रिकी महाविद्यालये विकसित करण्यासाठी विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. करिसिद्दप्पा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिलेला अहवाल शासनाने स्वीकारला आहे. यामध्ये येथील अंगडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचा समावेश आहे. यामध्ये खासगी सोळा तर सरकारी 14 कॉलेजचा समावेश आहे.

प्रत्येक जिल्ह्यात जागतिक दर्जाची तंत्रशिक्षण संस्था निर्माण करण्याचा राज्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. आरईटीईअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी एका महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात उच्च दर्जाचे अभियांत्रिकी शिक्षण देण्यासाठी ब्लू प्रिंट तयार करण्यासाठी नोव्हेंबर 2021 मध्ये उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

महाविद्यालये निवडण्यासाठी नवोद्यम व्हिजन ग्रुपचे प्रमुख प्रशांत प्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन करण्यात आली. सरकार आणि उद्योजक व विश्‍वेश्‍वरय्या तांत्रिक विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आरईटीई कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकी 30 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील अभियांत्रिकी महाविद्यालयांची श्रेणी सुधारून ग्रामीण विद्यार्थ्यांना औद्योगिक जागरूकता, संशोधनावर आधारित तांत्रिक शिक्षण देणे हा त्या मागचा उद्देश आहे. निवडलेल्या महाविद्यालयांचा समावेश पॅट्रोनेज इनक्युबेशन, एक्सिलरेटर आणि सुपर-30 अशा 3 श्रेणींमध्ये केला जाणार आहे.

जागतिक गरजा पूर्ण करण्यासाठी ही महाविद्यालये विद्यार्थीकेंद्रित कौशल्ये आणि संशोधन बहु-विषय शिक्षण प्रदान करणार आहेत. या योजनेंतर्गत अंगडी अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बंगळूर किंवा इतर जिल्ह्यांत जाण्याची गरज नाही. सुपर-30 साठी संस्था निवडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीने आपल्या शिफारशी, प्रादेशिक इकोसिस्टम फॉर टेक्निकल एक्सलन्स अहवाल सरकारला सादर केला आहे.

याबाबत अंगडी तांत्रिक विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी राजू जोशी म्हणाले, शैक्षणिक संस्थांमध्ये गुणवत्तापूर्ण आणि सतत सुधारणा करण्याची संस्कृती निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. 14 सरकारी आणि 16 खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये यामध्ये आहेत. आमच्या संस्थांची निवड निकषांवर आणि इनक्यूबेट, एक्सिलरेट आणि सुपर 30 च्या 3-स्तरीय संरचनेवर आधारित आहे.
याद्वारे आमच्या महाविद्यालयांच्या क्रमवारीत सुधारणा करण्याचा आणि कर्नाटकला भारतातील सर्वोत्तम तांत्रिक शिक्षणाचे ठिकाण बनवण्याचा मानस आहे. आम्हाला पुढील 3 वर्षात सर्व संस्थांमध्ये शंभर टक्के प्लेसमेंट मिळवायचे आहे. हा उपक्रम आमच्या नियोजनाच्या अंमलबजावणीशी सुसंगत आहे.

 

ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आणि संशोधन वृत्ती वाढवण्याचे प्रयत्न आमचे सुरूच आहेत. शासनाने या योजनेत आमचा समावेश केला आहे. ही अभिमानाची बाब आहे. यामुळे आम्ही आणखी दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
– स्फूर्ती पाटील-अंगडी, संचालक, अंगडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट.

Back to top button