

बेळगाव : महापालिका कर्मचारी सहकारी सोसायटीच्या 2017-18 या वर्षातील उपाध्यक्षांनी प्रशासक मंडळाला विश्वासात न घेता संगोळ्ळी रायण्णा सोसायटीत 3 कोटी 40 लाख रुपयांची बेकायदा ठेव ठेवली. ही सोसायटी बुडीत निघाली असून याला जबाबदार असणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सभासदांनी सहकार निबंधकांकडे केली आहे.
नियमानुसार जर एखाद्या सोसायटीला गुंतवणूक करायची असेल तर ती फक्त राष्ट्रीय बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतच ठेवावी लागते. पण, 2017-18 काळातील सोसायटीच्या उपाध्यक्षांनी संगोळ्ळी रायण्णा सोसायटीत व्यवस्थापन मंडळाच्या निदर्शनास न आणता 3 कोटी 40 लाख रुपये बेकायदेशीरपणे गुंतवले आहेत.
गुंतवलेली ही रक्कम जनतेची आणि महापालिकेच्या कर्मचार्यांचे आहेत. 2017-18 या वर्षाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष उपस्थित असताना उपाध्यक्षांनी सोसायटीच्या पैशांचा गैरवापर केल्याचे आढळून आले आहे. संगोळ्ळी रायण्णा सोसायटी दिवाळखोरीत निघाल्याने या गुंतवणुकीबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
उपाध्यक्ष हा मनपाचा कर्मचारी आहे. त्यामुळे त्याने गुंतवलेली रक्कम त्याच्या पगारातून कापून घ्यावी. त्यांचा मतदानाचा हक्क रद्द करून त्यांना यापुढे निवडणुकीत उभे राहण्याची परवानगी देऊ नये, असेही निवेदनात नमूद आहे.