बेळगाव : ७५ मीटर तिरंग्याची रॅली; किल्ला तलावाकाठच्या सर्वात उंच स्तंभावरही फडकला तिरंगा | पुढारी

बेळगाव : ७५ मीटर तिरंग्याची रॅली; किल्ला तलावाकाठच्या सर्वात उंच स्तंभावरही फडकला तिरंगा

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : ‘भारत माता की जय’, ‘झंडा उँचा रहे हमारा’, ‘वंदे मातरम्’, ‘हर घर तिरंगा’, अशा घोषणा देत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी म्हणजेच 75 व्या वर्षानिमित्त शनिवारी 75 मीटर लांबीच्या तिरंगा ध्वजाची शहरातून फेरी काढण्यात आली. फेरीत प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. फेरीपूर्वी किल्ला तलावाकाठच्या देशातील सर्वांत उंच ध्वजस्तंभावर तिरंगा फडकवण्यात आला. सम्राट अशोक चौकापासून 75 मीटर लांबीच्या तिरंग्याची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक आरटीओ सर्कल जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून चन्नम्मा चौकापर्यंत आली. मिरवणुकीत अधिकारी व नागरिकांसह विविध शाळा-महाविद्यालयांचे हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. फेरीत फुलांची उधळण करण्यात आली. राष्ट्रगीताने मिरवणुकीची सांगता झाली.

अमृत महोत्सवानिमित्त देशातील सर्वात उंच असलेल्या किल्ला तलाव परिसरातील 110 मीटरच्या ध्वजस्तंभावर 9600 चौरस फुटी विशाल असा तिरंगा ध्वज शनिवारी फडकवण्यात आला. जोरदार पावसातही ध्वजरोहण समारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘हर घर तिरंगा’ या मोहिमेचा एक भाग म्हणून जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत व नगर महानगरपालिकेच्यावतीने शनिवारी किल्ला तलाव प्रांगणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. आ. अनिल बेनाके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आ. लक्ष्मी हेब्बाळकर, आ. डॉ. साबन्‍ना तळवार, आ. चन्‍नराज हट्टीहोळी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलिस आयुक्‍त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, महापालिका आयुक्‍त डॉ. रुद्रेश घाळी, निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्यासह अनेक मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

आ. हेब्बाळकर म्हणाल्या, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या मुहूर्तावर स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्‍या महापुरुषांचे आपण स्मरण केले पाहिजे. विविधतेत एकता लाभलेल्या आपल्या देशाचा अभिमान बाळगला पाहिजे. जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सरकारने ध्वज संहितेत बदल केला आहे. त्यामुळे 13 ऑगस्टपासून अखंडपणे ध्वज फडकवून प्रत्येकाने मोहिमेत सहभागी व्हावे.

बंगळूर : स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विधानसौधच्या आवारात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंत्र्यांसह या मोहिमेला शनिवारी चालना दिली. विधानसभा सभापती विश्‍वेश्‍वर हेगडे कागेरी, विधान परिषदेचे हंगामी अध्यक्ष रघुनाथ मलकापुरे, मंत्री डॉ. के. सुधाकर, के. गोपालय्या, भैरती बसवराज यांच्यासह हजारो मुलांनी हवेत फुगे सोडून मोहिमेला सुरुवात केली. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आपल्या निवासाच्या आवारात, भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील, जिल्हा पालकमंत्री, आमदारांनी आपापल्या घरावर तिरंगा फडकवला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू झाली आहे.

Back to top button