बेळगाव : जिल्ह्यात 8 लाख ध्वजांचे वितरण | पुढारी

बेळगाव : जिल्ह्यात 8 लाख ध्वजांचे वितरण

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाकडून आठ लाख ध्वजांचे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. विविध संस्था, संघटनांकडून दोन लाख ध्वजांचे यापूर्वीच वितरण करण्यात आले असून, जिल्ह्यातील उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. बाजारात ध्वज खरेदीसाठी शुक्रवारी गर्दी केली होती. वीसपासून शंभर रुपयांपर्यंतच्या ध्वजांना अधिक मागणी होती.

जिल्ह्यात सुमारे दहा लाख कुटुंबे असून, शासनाकडून आतापर्यंत आठ लाख ध्वजांचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे. विविध संस्था, पक्षांकडून सुमारे दोन लाख ध्वजांचे वितरण करण्यात आले आहे. यामुळे आपला जिल्हा सर्वात मोठा असून, ध्वजांचा तुटवडा नाही. सर्व ठिकाणी वितरणही करण्यात आले आहे. नागरिकांनी उद्या आपापल्या घरांवर ध्वज फडकवावा, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले.
पोस्टातील ध्वज संपले.

गेल्या चार दिवसांपासून येथील पोस्टमन चौकातील मुख्य पोस्ट कार्यालयात ध्वजांची विक्री करण्यात येत होती. शुक्रवारी दुपारी पोस्ट कार्यालयातील सर्व ध्वजांची विक्री झाल्याने तसा फलक पोस्ट कार्यालयाबाहेर लावण्यात आला.

 आज रॅली
हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शनिवारी सकाळी 8 वा. शहरात रॅली काढण्यात येणार आहे. याचा प्रारंभ सकाळी 8वा. किल्ला तलाव परिसरातून करण्यात येणार असून, ही रॅली शहरात फिरुन याची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात करण्यात येईल.

जिल्ह्यात कुटुंब संख्या दहा लाख असून, प्रशासनाकडून आठ लाख ध्वज आम्ही आणून वितरीत केले आहेेत. विविध संस्था आणि पक्षाकडून सुमारे दोन लाख ध्वज वितरित करण्यात आले आहेत. कोठेही तुटवडा नाही. नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन हर घर तिरंगा अभियान यशस्वी करावे. यासाठी असलेल्या नियमावलीचे पालन करावे. – नितेश पाटील, जिल्हाधिकारी, बेळगाव

Back to top button