बेळगाव : बहाद्दरवाडीचा ‘ब्रम्ह’देव, भावभक्‍तीची ठेव | पुढारी

बेळगाव : बहाद्दरवाडीचा ‘ब्रम्ह’देव, भावभक्‍तीची ठेव

किणये; जोतिबा मुरकुटे :  तालुक्यातील पश्‍चिम भाग निसर्गाने समृद्ध आहे. त्याचप्रमाणे मंदिरे, पर्यटन स्थळे, धार्मिक कार्यक्रम प्रसिद्ध आहेत. किणये पंचक्रोशीतील बहाद्दरवाडी येथील ब्रम्हलिंग मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे ठिकाण आहे. याठिकाणी दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या भागातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ म्हणून याची ओळख तयार झाली आहे.

याठिकाणी शिवलिंग असून त्याची भाविक मनोभावे पूजा करतात. मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला आहे. भव्य मंदिर उभारण्यात आले असून याठिकाणी परिसरातील शेकडो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अभिषेक, पूजाअर्चा करण्यात येते. यामध्ये गावकर्‍यांसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करतात.

बहाद्दरवाडी भागातील भाविकांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. यासाठी गावकर्‍यांनी लोकवर्गणी आणि देणगी जमा केली. परिसरातील भाविकांनीही आर्थिक हातभार लावला. यातून भव्य अशा मंदिराची उभारणी करण्यात आली. ग्रामदैवत ब्रम्हलिंग देवाचा गावांसह परिसरात फार मोठा महिमा आहे.

प्रत्येक सोमवारी आरती
मंदिर जागृत असल्याने याठिकाणी वारंवार धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये परिसरातील भाविक सहभागी होतात. प्रत्येक सोमवारी महाआरतीचा कार्यक्रम होतो. रोज भजन कार्यक्रम आयोजित केला जातो. यामध्ये गावकरी, भाविक सहभागी होतात.

पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार
ग्रामदैवत ब्रम्हलिंग मंदिराचा अलीकडे जीर्णोद्धार करण्यात आला आहे. यापूर्वी याठिकाणी पुरातन पांडवकालीन मंदिर होते. त्यामध्ये ब्रम्हलिंग देव म्हणून शिवलिंग होते. त्याची भाविक पूजा करत. परंतु मंदिर जीर्ण झाल्याने गावकर्‍यांनी एकत्र येऊन मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार केला.

आकर्षक मंदिर
नूतन मंदिर आकर्षक पद्धतीने बांधण्यात आले आहे. यासाठी लाखो रुपयांचा खर्च लोकवर्गणीतून जमा करण्यात आला. मंदिराची उभारणी परिसरातील अन्य मंदिरापेक्षा वेगळी आहे. यामुळे मंदिर पाहता क्षणी भाविकांचे लक्ष वेधून घेते. वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी भव्य समामंडप, गर्भगुढी असून त्यामध्ये शिवलिंगाची स्थापना केली आहे.

गुढी पाडवा उत्साहात
मंदिर कमिटीकडून गुढी पाडवा रोजी यात्रेचे आयोजन केले जाते. यावेळी महाप्रसाद वितरण करण्यात येतो. श्रावण महिन्यात पाच वार पाळण्यात येतात. शेवटच्या सोमवारी अभिषेक घालण्यात येतो. भाविकांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात येतो. मंदिर जागृत असल्याने परिसरातील भाविकांची गर्दी असते.

याठिकाणी पुरातन मंदिर होते. गावकर्‍यांनी एकत्र येऊन दोन वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार लोकवर्गणीतून केला आहे. मंदिरात सतत धार्मिक कार्यक्रम होतात. गावकर्‍यांसह परिसरातील भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात.
– मल्लाप्पा पाटील,
गावकरी

Back to top button