बेळगाव : शहरात ट्रक ठरताहेत काळ | पुढारी

बेळगाव : शहरात ट्रक ठरताहेत काळ

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : शहरात धावणारे ट्रक जणू काळच बनू लागले आहेत. बुधवारी सकाळी ट्रकच्या धडकेत शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली. शिवाय आणखी एक 12 वर्षांचा मुलगाही जखमी झाला आहे. रस्ता ओलांडण्यासाठी थांबलेल्या दुचाकीला ट्रकने धडक दिली.

बुधवारी सकाळी 8.45 वा. कॅम्पमधील पेट्रोल पंपापासून काही अंतरावरील बुढापा घरासमोर हा अपघात घडला. त्यानंतर संतप्‍त जमावाने ट्रक चालकाची धुलाई केली. तीन दिवसांत ट्रकने विद्यार्थ्याचा घेतलेला हा दुसरा बळी आहे. सोमवारी ट्रकखाली सापडून भरतेश कॉलेजची विद्यार्थिनी ठार झाली होती. तर आज झालेल्या अपघातात ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

अरहान फारूक बेपारी (वय 10, रा. कॅम्प) असे मृताचे नाव आहे. त्याची बहीण अतिकाअफसा फारूक बेपारी (वय 18, रा. कॅम्प) व पादचारी शाळकरी विद्यार्थी आयुष सचिन आजरेकर (रा. भाग्यनगर) हे दोघे जखमी आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रहदारी दक्षिण पोलिसांनी सांगितले.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अतिकाअफसा लहान भाऊ अरहानला दुचाकीवरून ज्योती सेंट्रल स्कूलला सोडण्यासाठी निघाली होती. ती कॅम्पमधील बुढापा घरासमोरील रस्त्यावर मुख्य रस्ता ओलांडण्यासाठी थांबली होती. यावेळी गोव्याहून लोखंडी सळ्या भरून आलेला ट्रक गोगटे सर्कलहून धर्मवीर संभाजी चौकाकडे येत होता. फिश मार्केटजवळ आल्यानंतर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. या ट्रकने आधी अतिकाअफसा हिच्या दुचाकीला धडक दिली, त्यानंतर समोर असलेल्या कारलाही जोराची धडक बसली. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या अरहानला ट्रकची धडक बसल्याने तो खाली पडला आणि जागीच ठार झाला. अतिकाअफसाही दुचाकीवरून उडून पडली. तीदेखील ट्रकच्या चाकाखाली आली होती. परंतु, ट्रक वेळीच थांबल्याने ती वाचली.

याच ठिकाणी भाग्यनगर येथून ज्योती सेंट्रल स्कूलला रिक्षाने येणारा विद्यार्थी आयुष हा देखील थांबला होता. रिक्षातून उतरून तो स्कूलकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडण्यासाठी थांबला होता. त्यालाही ट्रकची धडक बसल्याने तो जखमी झाला. अतिकाअफसा आणि आयुष या दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवाय अपघातात कारच्या पाठीमागील बाजूची काच फुटली आहे.

घटनास्थळी गर्दी; चालकाला मारहाण
घटनेनंतर लोकांची गर्दी झाली. चालकाची चूक असल्याचे लक्षात आल्यानंतर चालक रमजान (रा. पाच्छापूर) याला ट्रकमधून ओढून काढत जमावाने बेदम मारहाण केली. हाकेच्या अंतरावर असलेले रहदारी दक्षिण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रहदारी व गुन्हे विभागाच्या पोलिस उपायुक्‍त पी. व्ही. स्नेहाही दाखल झाल्या. जमावाला शांत करत त्यांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर जेसीबी बोलावून हा ट्रक हटवून रस्ता रहदारीला मोकळा करून दिला. पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक तपास करीत आहेत.

सोमवारी विद्यार्थिनी, बुधवारी विद्यार्थी
1 ऑगस्ट रोजी किल्ल्याजवळील जुन्या भाजी मार्केटजवळ कॉलेजला निघालेल्या सादिया शब्बीरअहमद पालेगार (वय 17, मूळ रा. बसवणकुडची) या युवतीच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने ती जागीच ठार झाली होती. या घटनेला 48 तास होत नाहीत तोच बुधवारी अरहानचा मृत्यू झाला.

चालक आजारी
अपघात घडवणारा ट्रकचालक गोव्याहून लोखंडी सळ्या भरून बेळगावला आला होता. तो आजारी असताना ट्रक चालवत गोव्याहून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याला रस्ता नीट दिसत नव्हता. तो तंदुरुस्त नसल्यानेच हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे आजारी असल्यास, झोप आली असल्यास वाहन चालवू नका, वाहन थांबवून विश्रांंती घ्या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Back to top button