बेळगाव : सरकारी दवाखान्यावर मराठी फलक लावा | पुढारी

बेळगाव : सरकारी दवाखान्यावर मराठी फलक लावा

खानापूर; पुढारी वृत्तसेवा :  खानापूर तालुक्यात मराठी भाषिकांची संख्या 70 टक्क्याहून अधिक आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या नागरिकांना सरकारी दवाखान्यात आल्यानंतर केवळ कन्नडमधील नामफलक आणि सूचनाफलकांमुळे गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. 10 ऑगस्टपर्यंत दवाखान्यावर मराठीतूनही नाम फलक लावावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा म. ए .समितीच्यावतीने तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांना देण्यात आला.

माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी समितीच्या कार्यकर्त्यांनी वैद्याधिकार्‍यांची भेट घेऊन मराठीला डावलल्याबद्दल जाब विचारला.

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आणि दवाखान्याच्या जुन्या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली आहे. जीर्ण झालेल्या नामफलकांचीही नव्याने उभारणी करण्यात आली आहे. पण हे करत असताना केवळ कन्नडमधील डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. दवाखान्याच्या अंतर्गत भागातही विविध विभागांची केवळ कन्नडमधून माहिती लावण्यात आली आहे. त्यामुळे कन्नड न येणार्‍या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. भाषा भेदामुळे कुचंबणा होत असून त्वरित मराठीचा वापर करावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आबासाहेब दळवी, मर्‍याप्पा पाटील, शिवाजी पाटील, यशवंत बिर्जे, डॉ. एल. एच. पाटील, रमेश देसाई, मुरलीधर पाटील, नारायण कापोलकर, शामराव पाटील, अमृत पाटील, शंकर गावडा, डी. एम. भोसले, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.

तहसीलदारांचे उत्तर आणि कार्यकर्त्यांची नाराजी
खानापूर-रामनगर रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी 18 जुलै रोजी म.ए. समितीने रस्ता रोको आंदोलन केले होते. याबाबत कार्यवाहीचे आश्वासन तहसीलदारांनी दिले होते. त्याची अंमलबजावणी न झाल्याने तहसीलदार प्रविण जैन यांची भेट घेऊन आश्वासनाची आठवण करून देण्यात आली. यावेळी तहसीलदारांनी अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार कार्यालयावरील मराठी फलकाच्या दुरुस्तीकडे त्यांचे लक्ष वेधले असता आपल्याला केवळ कन्नड फलकाचे सुशोभिकरण करण्याचे आदेश मिळाले होते, असे उत्तर दिल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

Back to top button