बेळगाव : बेनकनहळ्ळीचे ब्रह्मलिंग; एकवटती हिंदू,जैन! | पुढारी

बेळगाव : बेनकनहळ्ळीचे ब्रह्मलिंग; एकवटती हिंदू,जैन!

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  बेळगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर असणारे बेनकनहळ्ळी गावातील ब्रह्मलिंग मंदिर हिंदू, जैन धर्मीयांच्या एकतेचे प्रतीक बनले आहे. हिंदू समाजाप्रमाणे जैन समाजबांधवांची त्यावर अपार भक्ती असून येथील प्रथम पूजेचा मान जैन समाजाकडे आहे. विविधतेतून एकता साधणारे मंदिर दोन धर्मीयांच्या श्रद्धेचे ठिकाण बनले आहे.

बेनकनहळ्ळी गावात प्रवेश करण्यापूर्वी केंबाळी नाल्याजवळ रामघाट रोडपासून उजवीकडे सुमारे अर्धा कि. मी. कच्च्या रस्त्याने गेल्यास निसर्गसंपन्न वातावरणात वसलेले ब्रह्मलिंग मंदिर पाहावयास मिळते. सुमारे 1 एकर 27 गुंठे इतका विस्तृत परिसर याठिकाणी आहे. वेगवेगळ्या जातीची वाढलेली झाडे, सभोवती भाताची शिवारे, मंदिराच्या आवारात असणारे मन प्रसन्न करणारा तलाव, बाजूला तीन वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आलेले श्री ब्रह्मलिंग देवाचे मंदिर भाविकांना आकर्षित करते.

येथून जवळच गणेशपूर, लक्ष्मीनगर, क्रांतीनगर, शिवमनगर आदी वसाहती आहेत. त्याठिकाणी अनेक निवृत्त सैनिक, अधिकारी यांची वसाहती वाढल्या आहेत. त्यामुळे गावकर्‍यांसह गणेशपूर, बेळगाव परिसरातून सोमवार व इतर दिवशी येणार्‍या भाविकांची संख्या वाढली आहे. याठिकाणी नियमितपणे पूजा, धार्मिक विधींचे आयोजन करण्यात येते.

निसर्गरम्य मंदिर परिसर
मंदिराच्या मालकीची 1 एकर 27 गुंठे जागा आहे. त्यापैकी सुमारे 27 गुंठे जागेत तलाव आहे. त्याठिकाणी घाट बांधण्यात आला आहे. उर्वरित जागेत मंदिर असून बाजूला पाच पांडवांची पाच लहान मंदिरे आहेत. परव आदी कार्यक्रमासाठी स्वयंपाकघर व निवारा बांधण्यात आला आहे.

जैन समाजाला मान
गावात अधिकप्रमाणात मराठा समाज व अन्य समाज आहे. जैन समाज नाही. परंतु याठिकाणी पूजेचा मान जैन समाजाला आहे. जैन समाजाकडून श्रावण महिन्यात परव कार्यक्रम आयोजित केला जातो.

धार्मिक कार्यक्रम
मंदिर कमिटी व गावकर्‍यांकडून दसरा सणादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मे महिन्यात महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. प्रत्येक सोमवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते.

1865 चा शिक्‍का
मंदिर पुरातन काळापासून आहे. याठिकाणी लहान स्वरुपात कौलारू मंदिर यापूर्वी होते. हा भाग शिवारात असल्याने येण्या जाण्यासाठी पावसात रस्त्याची सुविधा नव्हती. भाविकांना अडचणींना सामोरे जावे लागत असे. त्यामुळे वर्दळ कमी होती. त्यानंतर 1973 मध्ये पहिल्यांदा जुन्या मंदिराचा गावकर्‍यांनी जीर्णोद्धार केला. 2019 मध्ये गावकर्‍यांनी सुमारे 74 लाख खर्चून भव्य असे मंदिर उभारले असून याठिकाणी सध्या भाविकांची वर्दळ वाढली आहे. याठिकाणी 1865 चा शिक्‍का आढळून आल्याने मध्ये पुरातन असल्याच्या मताला पुष्टी मिळते.

मंदिरातील मूर्ती पुरातन काळापासून आहे. गावकर्‍यांनी वेळोवेळी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिराचा महिमा वाढत चालला असून भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याठिकाणी पूजेचा मान जैन समाजाचा आहे.
युवराज पाटील, देवस्की पंच

Back to top button