बेळगाव : शॉटसर्किटने आगीत 2 कोटींची औषधे खाक | पुढारी

बेळगाव : शॉटसर्किटने आगीत 2 कोटींची औषधे खाक

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  घाऊक औषध दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे 2 कोटींची औषधे जळून खाक झाली. रविवारी सकाळी 10.30 च्या सुमारास देशपांडे गल्ली येथे ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी खडेबाजार पोलिसांत नोंद झाली आहे.
देशपांडे गल्लीतील उमा अपार्टमेंटमध्ये आदर्श फार्मा नावाचे भागीदारीत औषध विक्रीचे दुकान आहे. संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातील किरकोळ मेडिकल व्यावसायिकांना येथून औषधांचा पुरवठा होतो.

फ्रिजमध्ये शॉर्टसर्किट
शनिवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून मालक व कर्मचारी निघून गेले. रविवारी सकाळी 10.30 च्या सुमारास वरती राहणार्‍या एका कुटुंबाने आदर्श फार्मामधून धूर येत असल्याची माहिती दुकान मालकाला दिली. त्यांनी जाऊन दुकान उघडले असता संपूर्ण दुकान धुराने माखले होते. फ्रिजचा स्फोट होऊन दोन लोखंडी रॅकमधील औषधे जळून खाक झाली होती. उर्वरित औषधांना धग लागल्याने ती खराब झाली होती. यामध्ये 2 कोटींची औषधे जळाल्याचे सदानंद कुमार जी. यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तशी फिर्याद खडेबाजार पोलिसांनी घेतली असून निरीक्षक दिलीप निंबाळकर तपास करीत आहेत.

आग आतच धुमसली
सायंकाळी 7.30च्या सुमारास दुकान बंद करून गेल्यानंतर ही आग नेमकी कधी लागली याची कल्पना दुकान मालकाला नाही. शिवाय दुकान चारी बाजूंनी बंदिस्त असल्याने बाहेर आगीची कोणतीच लक्षणे दिसून आलेले नाही. त्यामुळे शेजार्‍यांना देखील आग लागल्याची कल्पना आली नाही.

Back to top button