बेळगाव : जवानाला मारहाण; सहाजणांना कारावासाची शिक्षा | पुढारी

बेळगाव : जवानाला मारहाण; सहाजणांना कारावासाची शिक्षा

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा :  जवानाला मारहाण आणि लुटीच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या कब्बूर (ता. चिकोडी) येथील सहा दोषींना विविध कलमाखाली अडीच वर्षांच्या कारवासाची आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अकराव्या जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी (दि. 30) शिक्षा ठोठावण्यात आली.

कोन्नूरमधील (ता. गोकाक) जवान दयानंद शिंदीहट्टी यांना 1 जून 2018 रोजी चिकोडी रेल्वे स्थानक परिसरात मारहाण करण्यात आली होती. याविरुध्द बेळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या खटल्यात अशोक तिप्पण्णा बागी, विठ्ठल बुध्देप्पा होसूर, शिवानंद उर्फ शिवाप्पा तिप्पाण्णा बागी, रामाप्पा बुध्दाप्पा होसूर, गिरीमल्लाप्पा बुध्देप्पा होसूर आणि सिद्राम सिध्दाप्पा बागी (सर्व रा. कब्बूर, ता. चिकोडी) यांना गुरुवारी (दि. 28) दोषी ठरविण्यात आले होते.

भारतीय दंड संहिता कलम 149 च्या उपकलम 323 अंतर्गत दोन महिन्यांचा साधा करावास, याच कलमाच्या उपकलम 354 अंतर्गत एक वर्षाचा कारावास आणि प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याचा कारावास, उपकलम 395 अंतर्गत अडीच वर्षांचा कठोर कारावास आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्याची साधी कैद, उपकलम 147 सहा महिन्यांचा साधा कारावास ठोठावण्यात आला आहे. ही सर्व शिक्षा त्यांना एकत्रित भोगावी लागणार आहे. यासह उपकलम 357 अंतर्गत तीस हजार रुपयांची भरपाईदेखील द्यावी लागणार आहे. न्यायाधीश रमाकांत चव्हाण यांनी ही शिक्षा ठोठावली. सरकारी वकील म्हणून शैलजा पाटील यांनी काम पाहिले.

Back to top button