निपाणी परिसराला पावसाने झोडपले | पुढारी

निपाणी परिसराला पावसाने झोडपले

निपाणी; पुढारी वृत्तसेवा :  निपाणी शहर परिसरला शनिवारी दुपारी पावसाने झोडपून काढले. तब्बल बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. मुसळधार पावसाने झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

यंदा पहिल्या चरणातील मृग नक्षत्रानंतर दुसर्‍या चरणातील आर्द्रा नक्षत्राने पूर्णपणे उघडीप दिली होती. तिसर्‍या चरणातील पुनर्वसू नक्षत्राने चांगली साथ दिली. त्यामुळे रखडलेल्या पेरणी कामाला गती मिळाली होती. चौथ्या चरणातील पुष्य नक्षत्राला दि. 20 रोजी सुरुवात झाली. या नक्षत्रात पावसाने तब्बल दहा दिवस उघडीप दिल्याने माळरानातील पिके धोक्यात आली होती. कडक उन्हामुळे पिकांना धोका निर्माण झाला होता. उगवण झालेल्या पिकांना पावसाची गरज होती. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.

अखेर शनिवारी दुपारनंतर परिसराला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे सगळीकडे पाणीचपाणी झाले. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला असून, शेतकर्‍यांतून समाधान व्यक्‍त होत आहे.

 

   मेघगर्जनेसह पाऊस

शनिवारी मेघगर्जनेसह मोठा पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांतून आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. मेघगर्जनेसह वळीव पाऊस होतो. मात्र, ऐन पावसाळ्यात विजांचा कडकडाटासह पाऊस झाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. दरम्यान, मंगळवार, दि. 2 पासून पाचव्या चरणातील आश्‍लेषा नक्षत्राला सुरुवात होणार असून वाहन मोर आहे.

Back to top button