निपाणी : लखनापूर ग्राम पंचायत अध्यक्षपद काँग्रेसकडे | पुढारी

निपाणी : लखनापूर ग्राम पंचायत अध्यक्षपद काँग्रेसकडे

निपाणी; पुढारी वृत्तसेवा :  नजीकच्या लखनापूर-पडलीहाळ ग्रुप ग्राम पंचायतच्या अध्यक्षपदी सुरेखा नारायण सूर्यवंशी यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी जी. डी. मंकाळे यांनी केली. अध्यक्षपदासाठी सुरेखा सूर्यवंशी व दिलीप कांबळे यांचे काँग्रेस व भाजपकडून अर्ज दाखल झाले होते.

निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समान 5-5 अशी मते पडली. त्यामुळे चिठ्ठी टाकून अध्यक्ष निवडीचा निर्णय घेण्यात आला. अनुराग कांबळे या 6 वी मध्ये शिकणार्‍या मुलाने चिठ्ठी काढली. यामध्ये सुरेखा सूर्यवंशी यांची निवड झाली. निवडीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. निवडीनंतर निवडणूक अधिकारी मंकाळे व पीडीओ झेंडे यांनी नूतन अध्यक्षांचा सत्कार केला.

काँग्रेसच्या रुक्मिणी भोसले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने ही निवड करण्यात आली. बुधवारी उपाध्यक्षा लक्ष्मी मगदूम यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या पंचायतीमध्ये 5-5 असे समान बलाबल झाले होते. त्यामुळे अध्यक्षपदाची लॉटरी कोणाला लागणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती.

ग्राम पंचायतीसमोर सीपीआय शिवयोगी संगमेश यांनी विशेष पोलिस बंदोबस्त ठेवला होता. काँग्रेसच्या बाजूने रुक्मिणी भोसले, विनायक पाटील, सुरेखा सूर्यवंशी, संभाजी पाटील व बेबीजान शिरकोळी यांनी मतदान केले तर भाजपच्या बाजूने लक्ष्मी मगदूम, मल्लिकार्जुन शिंदे, समित सासणे, गीता नाईक व दिलीप कांबळे यांनी मतदान केले.

काँग्रेसचा गट फुटला नाही : उत्तम पाटील
या निवडणुकीत काँग्रेसचा गट फोडण्याचे विरोधकांनी पुरेपूर प्रयत्न केले. मात्र सर्व सदस्य एकत्र राहिले. ग्रामस्थांनी सहकार्य केले. त्यामुळे अध्यक्षपदाचा कौल काँग्रेसच्या बाजूने लागला. काँग्रेसच्या गट फोडता आला नाही. माजी आमदार काकासाहेब पाटील व प्रा. सुभाष जोशी यांचे पाठबळ लाभले. विरोधकांनी राजकारण करू नये. गट- तट न करता निवडणुकीनंतर सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लोकप्रतिनिधी लक्ष दिले पाहिजे, असे उत्तम पाटील यांनी सांगितले. त्यांनी नूतन अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी राजू पाटील, निरंजन पाटील, श्रीनिवास संकपाळ, संजय संकपाळ, निकू पाटील व शिरीष कमते उपस्थित होते.

Back to top button