

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : लखनापूर ग्राम पंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी मगदूम यांनी कार्यकर्त्यांसह बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत मंत्री शशिकला जोल्ले यांनी केले. मगदूम यांच्या भाजप प्रवेशाने लखनापूर-पडलीहाळ ग्रुप ग्राम पंचायतमध्ये काँग्रेस व भाजप सदस्यांची संख्या 5-5 अशी झाली आहे. अध्यक्षा रुक्मिणी भोसले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी गुरुवारी निवडणूक होणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची संधी कोणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सव्वा वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे 5, भाजपचे 4 व अपक्ष 1 सदस्य निवडून आले होते. अपक्ष उमेदवाराने काँग्रेसला साथ दिल्याने या पंचायतीवर काँग्रेसची सत्ता आली होती. सव्वा वर्षानंतर काँग्रेसने अध्यक्ष-उपाध्यक्ष बदलाचा निर्णय घेतला. त्यामुळे रुक्मिणी भोसले यांनी राजीनामा दिला. उपाध्यक्षा लक्ष्मी मगदूम यांनी राजीनामा न देता भाजप प्रवेश केला आहे. त्यामुळे येथे समसमान बलाबल झाले आहे. गुरुवारी सकाळी दहा ते बारापर्यंत अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत. बारा ते साडेबारा या वेळेत अर्जांची छाननी, साडेबारा ते एक अर्ज माघार व दुपारी एक वाजता मतदान घेतले जाणार आहे.
मंत्री जोल्ले यांनी मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासामध्ये आम्ही कमी पडणार नाही. महिला बचत गटांना स्वयंरोजगार करण्यासाठी अनुदान देण्याबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना गावागावांपर्यंत पोहोचवून विकासकामे करू अशी ग्वाही मंत्री जोल्ले यांनी दिली.
महावीर बेडकीहाळे यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपये मंजुरीचे पत्र तसेच पेन्शन मंजूर झालेल्या पत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास भाजप ग्रामीण अध्यक्ष पवन पाटील, हालशुगरचे उपाध्यक्ष एम. पी. पाटील, संचालक रामगोंडा पाटील, समित सासणे, सरोजा जमदाडे, प्रकाश शिंदे, सिद्धू नराटे, संजय स्वामी, दादा शिंदे, आप्पा केसरकर, बाबुराव लाटकर, प्रकाश दिवाण आदी उपस्थित होते.
सदस्य संख्या 5-5
लखनापूर-पडलीहाळ ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस व भाजप सदस्यांची संख्या आता 5-5 अशी समान झाली आहे. अध्यक्षा रुक्मिणी भोसले यांनी राजीनामा दिल्याने गुरुवारी निवडणूक होणार आहे. एससी आरक्षण असल्याने या पदासाठी काँग्रेसमधून सुरेखा सूर्यवंशी तर भाजपमधून दिलीप कांबळे हे इच्छुक उमेदवार आहेत. काँग्रेसने आपल्या सदस्यांना सहलीवर नेले आहे. समान बलाबल झाल्याने अध्यक्षपद कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.