बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : कंग्राळी बुद्रुक येथील शिवाराकडे जाणार्या रस्त्यावर माती टाकण्यात आल्याने शेतकर्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातून कसरत करत शेताकडे जावे लागत आहे.
पवार यांच्या घरापासून पंपिंग स्टेशनकडे जाणार्या मार्गावर माती टाकण्यात आली आहे. मातीचा रस्ता असल्याने पावसाने चिखलाची समस्या निर्माण झाली आहे. या मार्गावरून जाताना चिखलात पाय रुतून बसत असल्याने शेतकर्यांना अडचणीचे ठरत आहे. त्याच मार्गाला पंपिंग स्टेशन असल्याने पावसाळ्यात जाणे अवघड बनले आहे. ऐन पावसातच रस्ता काम करण्यात आल्याने शेतकर्यांच्या अडचणीत भर पडली आहे. पावसाने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून ये-जा करताना गावकर्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या शेतातील कामे जोमात सुरू आहेत. पेरणीची कामे उरकली असली तरी शेतकरी भात रोपलागवड आणि पिकांमध्ये आंतरमशागत करण्यात गुंतले आहेत. त्यांना चिखलाचा सामना करावा लागत आहे.
शेतामध्ये काम करणार्या महिला शेतकर्यांची संख्या अधिक आहे. त्यांना या चिखलातूनच रोज ये-जा करावी लागत आहे. रस्त्यावर निसरड निर्माण झाल्याने कसरत करावी लागत आहे.
मार्गावर माती टाकल्याने वाहने याठिकाणी रुतून बसत आहेत. एखादी गाडी येथून गेल्यास सर्वांच्या अंगावर चिखल उडत आहे. वाहनधारकांनाही कसरत करावी लागत आहे. जनावरांना चारा आणण्यासाठी दुचाकींचा वापर केला जातो. या मार्गावर चिखलाचे साम्राज्य असल्याने चारा आणातानाही शेतकर्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दुरुस्तीची मागणी
रस्ता चिखलमय झाल्याने गावकर्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन शेतकर्यांची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी शेतकर्यांतून करण्यात येत आहे.