बेळगाव : 13 ते 15 ऑगस्टपर्यंत ‘हर घर तिरंगा’ फडकवणार | पुढारी

बेळगाव : 13 ते 15 ऑगस्टपर्यंत ‘हर घर तिरंगा’ फडकवणार

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस ‘हर घर तिरंगा’ मोहीम होणार आहे. या अंतर्गत प्रत्येक घर, शासकीय कार्यालय, संस्थांच्या इमारतींवर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. यासाठी शासनाच्या वतीने 25 रुपयांना एका ध्वजाचा पुरवठा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हर-घर तिरंगाबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांतील अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., पोलिस उपायुक्त रवींद्र गडादी, निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महापालिकेचे आयुक्‍त रुद्रेश घाळी आदी उपस्थित होते.
देशभरात हर घर तिरंगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व घरे, शासकीय कार्यालये, संस्थांच्या इमारतींवर ध्वजारोहण करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. लोकप्रतिनिधी, मान्यवर, विविध विभागांचे अधिकारी यांनी ट्विट आणि इतर सोशल नेटवर्कचा व्यापक वापर करून याचा प्रसार करावा. त्याचप्रमाणे बॅनर आणि पत्रके छापून प्रचार करण्यात येणार आहे.

जनतेने, सर्व शासकीय कर्मचारी, अंगणवाडी, आशा सेविकांनी घरोघरी झेंडे फडकवून कार्यक्रमात सहभागी व्हावे. भारत सरकारने ध्वज संहितेत काही बदल केले आहेत, जेणेकरून प्रत्येकाला त्यांच्या घरावर ध्वज फडकवता येईल. त्यामुळे ध्वजारोहण दिनाची सोय होणार आहे.

शासनाकडून पुरवठा करण्यात येणारे ध्वज संबंधित विभाग आणि शहर स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत जनतेला देण्यात येणार आहेत. नागरिकांना झेंडे 25 रुपयांना देण्यात येणार आहेत. प्रत्येक कुटुंबापर्यंत ध्वज पोहोचविण्याची कार्यवाही अधिकार्‍यांनी करावी, अशा सूचना त्यांनी
केल्या.

जिल्ह्यासाठी 30 हजार ध्वज प्राप्त
बेळगाव जिल्ह्यासाठी शासनाकडून 30 हजार ध्वज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी पाटील यांन दिली. हे ध्वज विविध विभागामार्फत नागरिकांना देण्यात येणार आहेत. हाच ध्वज घरावर लावण्यात यावा की, बाजारात उपलब्ध ध्वज लावता येईल याबाबतचा  खुलासा शासनाकडून घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Back to top button