बेळगाव : गणेशोत्सवात पीओपी, डीजेवर बंदी | पुढारी

बेळगाव : गणेशोत्सवात पीओपी, डीजेवर बंदी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  गणेशोत्सवात पीओपी मूर्ती डीजेवर बंदी असेल. गणेशोत्सवासाठी विविध परवानग्यांसाठी महापालिकेत एक खिडकी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.

गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी आणि अधिकार्‍यांची सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. पोलिस आयुक्‍त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जि. पं. सीईओ दर्शन एच. व्ही., महापालिका आयुक्‍त डॉ. रुद्रेश घाळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालय व शासनाने वेळोवेळी दिलेले आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार गणेशोत्सव व इतर सण साजरे करावे लागणार आहेत. बेळगाव शहर व जिल्ह्यात 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव होणार आहे. उत्सवादरम्यान डीजेला परवानगी नाही. काही काळासाठी ठरावीक डेसीबलमध्ये स्पीकरला परवानगी दिली जाईल. नियमानुसार सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी नसेल. संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी सुरु करण्यात येणार आहे. येथे अर्ज केल्यानंतर 24 तासांत परवानगी देण्याची कार्यवाही होईल.पोलिस, हेस्कॉम, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महामंडळासह सर्व विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत.

पोलिस आयुक्‍त डॉ. बोरलिंगय्या म्हणाले, 10 मेनंतर न्यायालय आणि सरकारने दिलेले आदेश व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. हे निर्बंध केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित नाहीत तर सर्व सणांसाठी आहेत. अलिकडे झालेल्या वायू, ध्वनी आणि जलप्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालय आणि सरकार प्रदूषण रोखण्यासाठी कठोर पावले उचलत आहेत.

जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील, निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पोलिस उपायुक्त रवींद्र गडादी, अतिरिक्‍त पोलिसप्रमुख महानिंग नंदगावी, रमाकांत कोंडुस्कर, सुनील जाधव, विकास कलघटगी, नगरसेवक रवी साळुंखे, गिरीश धोंगडी, नितीन जाधव, सागर पाटील, महादेव पाटील, हेमंत हावळ, रवी कलघटगी, राजकुमार खटावकर यांच्यासह लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळ, मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळहसह शहरातील गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी बैठकीत सहभागी झाले होते.

गणेशोत्सव मंडळाच्या मागण्या…
तीन वर्षांपूर्वी पीओपी मूर्ती तयार करण्यात आल्यामुळे आणि आम्ही वाहत्या पाण्यात त्या विसर्जित करीत नसल्यामुळे या मूर्तींना परवानगी देण्यात यावी. सणावेळी मराठीतून परिपत्रके उपलब्ध करावीत. रस्ते दुरुस्ती, वीज खांब बसवावेत. मिरवणुकीत अडथळा ठरणार्‍या ऑप्टिकल फायबर नेटवर्कच्या तारा इतरत्र हवण्यात याव्यात. हेस्कॉम 3500 रुपये अनामत रक्कम घेत असल्यामुळे तो निर्णय रद्द करावा. गणेशोत्सव काळात रात्री बारापर्यंत हॉटेल खुली ठेवावी. बस, रिक्षासेवा उशिरापर्यंत सुरू करावी.

     बैठकीतील निर्णय

  • पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी पीओपी मूर्तीवर बंदी.
  • पीओपी गणेशमूर्ती बनवणार्‍यांना अगोदरच माहिती द्यावी लागत असल्याने बैठक खूप अगोदर घेण्यात आली.
  • खड्डे बुजवण्यासाठी तातडीने कार्यवाही ची सूचना मनपाला देण्यात आली.
  • उत्सव काळात आवश्यक सुविधा देण्यासाठी कॅन्टोण्मेंट बोर्ड आणि वन खात्यात समन्वय साधण्यासाठी बैठक बोलावणार
  • गणेशोत्सव योग्य पद्धतीने साजरा व्हावा यासाठी पोलिस स्टेशन स्तरावरही बैठका घेण्यात येणार,
  • सुरक्षितता उपाययोजना करण्याच्या मंडळांना सूचना,
  • शहरात 378 ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना होणार,
  • कोरोना नियमावलीच्या पालनाची सूचना

Back to top button