

गर्लगुंजी; पुढारी वृत्तसेवा : यंदा पावसाळ्यात गर्लगुंजीतील शंभर वर्षे पूर्ण केलेली शाळा इमारत जमीनदोस्त झाली असून पहिली ते सातवीचे वर्ग भरवावे कुठे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना व्हरांड्यातच बसवून शिकवले जात आहे.
पहिली ते सातवीच्या वर्गात 155 विद्यार्थी असून सात शिक्षक सेवा बजावत आहेत. 10 जुलै रोजी शाळेच्या इमारतीमधील दुसर्या वर्गाचे नुकसान झाले. यापूर्वी शाळेच्या बाजूला असलेल्या झाडाची फांदी पडून एका वर्गखोलीचे नुकसान झाले होते. यंदा पावसाळ्यात शाळेचे पुन्हा नुकसान झाल्याने संपूर्ण इमारत धोकादायक बनली. शाळा सुधारणा समितीने बैठक घेऊन धोकादायक इमारतीमध्ये वर्ग न भरवण्याचा निर्णय घेतला. गावातील एका मंदिरात व समुदाय भवनामध्ये शाळा भरवण्याचा निर्णय झाला. मात्र, या ठिकाणी प्राथमिक सुविधा नसल्याने वर्ग व्हरांड्यात भरवण्यात येत आहेत.
शाळा कुठे भरवायची याबाबत चर्चा झाली. मात्र, यातून काही मार्ग निघाला नाही. व्हरांड्यात शाळा भरवली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिक्षणाधिकार्यांना कल्पना देण्यात आली आहे. पण अजूनही याविषयी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सध्या पावसाळा असून तालुक्यात मोठा पाऊस असतो. त्यातच व्हरांड्यात वर्ग घेण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गावात जुनी मंदिरे पाडून नवी मंदिरे बांधण्यात आली. मात्र, गावातील ज्ञानमंदिर बांधण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावातून होत आहे. काही गावांतील पुढारी सरकार दरबारी निधी मिळवून त्यातून शाळा उभारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 15 लाखांचा निधीदेखील जि. पं. मधून मंजूर झाला आहे. मात्र, संपूर्ण शाळाच जमीनदोस्त झाल्याने हा निधी पुरेसा नाही.