‘विसरून जा’ म्हटल्याच्या रागातून प्रेयसीचा खून करून युवकाची आत्महत्या | पुढारी

'विसरून जा' म्हटल्याच्या रागातून प्रेयसीचा खून करून युवकाची आत्महत्या

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : दोन वर्षांपासून प्रेमाच्या आणाभाका घेतल्यानंतर आता मला विसरून जा, असे म्हटल्याने चिडलेल्या तरुणाने प्रेयसीचा गळा आवळून खून केला. यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटे शहरातील बसव कॉलनी येथे ही घटना उघडकीस आली.

रेणुका केंचाप्पा पंचन्नवर (वय 29, रा. मुद्दूर, ता. सौंदत्ती) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. रामचंद्र बाळाप्पा तेनगी (30, रा. हुलीगोप्प, ता. सौंदत्ती) याने हा खून केल्याचा गुन्हा नोंद झाला असून, त्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रेणुका व रामचंद्र एकाच तालुक्यातील होते. रेणुका ही राणी चन्नम्मा विद्यापीठात एम.ए. करून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. ती एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणूनही कार्यरत होती. काही वर्षांपूर्वी दोघांची ओळख झाली व त्यानंतर दोन वर्षांपासून ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवसांपासून रामचंद्रने रेणुकाला लग्नासाठी गळ घातली होती. परंतु, रेणुका त्याच्याशी लग्न करून घेण्यास तयार नव्हती. आपली भेट ही एक वाईट स्वप्न समजून विसरून जा, असे तिने काही दिवसांपूर्वी त्याला सांगितले. त्यामुळे रामचंद्र चिडला होता. त्यावरून गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता.

ओढणीने आवळला गळा

रामचंद्र माळमारुती परिसरात होस्टेलवर राहत होता. तर तर रेणुका एपीएमसी परिसरातील बसव कॉलनीत राहत होती. गुरुवारी रात्री रामचंद्र रेणुकाला भेटण्यासाठी तिच्या खोलीकडे गेला. येथे त्या दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला, हे समजू शकले नाही. मात्र रामचंद्रने रेणुकाची ओढणी घेऊन तिचा गळा आवळत तिला फरफटत बाथरूममध्ये नेले. तिथे पुन्हा करकचून गळा आवळत तिचा खून केला. यानंतर त्याने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रवींद्र गडादी, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमणी, एपीएमसीचे निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या सहकार्‍यांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले.

आत्महत्येआधी चिठ्ठी

रेणुकाचा खून करून आत्महत्या करण्यापूर्वी रामचंद्रने चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये त्याने म्हटले आहे की, मी तिच्यावर प्रेम केले, पण लग्नाची मागणी करतातच तिने मला ‘वाईट स्वप्न समजून विसरून जा’, असे म्हणत टाळले. तिने माझे आयुष्य बरबाद केले आहे. पोरांनी अशा फसव्या पोरींच्या नादी लागून फसू नये.

घरच्यांना मेसेज

तरुण-तरुणीचे बहुदा दिवसा भांडण झाले असावे. त्यामुळे रात्रीच्या वेळी तरुणाने आपल्या पालकांना मेसेज करत आपण आत्महत्या करत असल्याचे कळवले. यानंतर त्याने चिठ्ठीही लिहून ठेवली. रात्री उशिरा तो पुन्हा तरुणीच्या घरी जाऊन भांडण झाल्यानंतर आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

फोनच्या लोकेशनवर गाठली खोली

रामचंद्रने आत्महत्या करण्याचे आधीच नियोजन केले असल्याचा संशय आहे. कारण, गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास त्याने आपल्या पालकांना मेसेज पाठवत आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते. मुलाचा असा मेसेज पाहून पालक तातडीने बेळगावला येण्यास निघाले; परंतु तो होस्टेलमध्ये आढळला नाही. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी रामचंद्रचा फोन ट्रॅक केला असता, फोन बसव कॉलनी परिसरात असल्याचे ट्रॅकर यंत्रणेवर दिसले. त्यावरून बसव कॉलनीतील तरुणीचे घर गाठले असता दोघांचेही मृतदेह आढळून आले.

Back to top button