

खानापूर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी जुन्या घरांच्या पडझडीचे सत्र मात्र सुरूच आहे. मळव (ता. खानापूर) येथील एका शेतमजूर कुटुंबाचे राहते घर कोसळल्याची घटना घडली आहे. जीवनावश्यक साहित्य व भांडी मातीच्या ढिगार्याखाली सापडल्याने सरस्वती बुद्दाप्पा गावडे या महिलेचे मोठे नुकसान झाले आहे.
सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सरस्वती, त्यांचा मुलगा व सून शेताकडे गेले होते. तर त्यांची नातवंडे शाळेला गेली होती. घरात कोणी नसताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत घरातील सर्व साहित्याचे मोठे नुकसान झाले. सरस्वती गावडे यांची हलाखीची स्थिती असल्याने प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच तलाठी महेश बुरुड, ग्राम पंचायत उपाध्यक्ष विनायक मुतगेकर व पीडीओंनी नुकसानीची पाहणी केली. याबाबतचा अहवाल तहसीलदारांना सादर करून तातडीने भरपाई देण्याची सूचना तलाठी बुरुड यांना करण्यात आली आहे.
हवा मदतीचा हात
सरस्वती आणि त्यांच्या कुटुंबीयांची उपजीविका मजुरीवर अवलंबून आहे. संसारोपयोगी साहित्य आणि अन्नधान्यदेखील मातीच्या ढिगार्याखाली सापडल्याने या कुटुंबाला जगण्याची चिंता लागून आहे. छत गमवावे लागल्याने संसाराची घडी बसविण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. सध्या दुसर्यांच्या घरात आसरा घेतलेल्या या कुटुंबाला मदतीचा हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले आहे.
जांबोटी : पुढारी वृत्तसेवा
जांबोटी भागात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे विविध टिकाणी नुकसान झाले. कालमणीत तानाजी भीमराव मेंडिलकर यांच्या गोठ्याची भिंत पडून त्यामध्ये असलेल्या शेळीचा जागीच मृत्यू झाला. तर बैल, म्हैस जखमी झाले. त्यामुळे मेंडिलकर यांचे वीस हजार रूपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्य डॉ. उमेश होसूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
आमगावमध्ये घरावर झाड पडून नुकसान झाल्याची घटना घडली आहे. मुकुंद घाडी यांच्या घरावर झाड पडून कौलांचे नुकसान झाले. याची माहिती मिळताच तलाठी, आमटे ग्रा. पंचायटीच्या कर्मचार्यांनी पाहणी केली.