बेळगाव : खानापुरात 16 शाळा इमारती धोकादायक
बेळगाव; प.य. पालकर : खानापूूर तालुक्यातील 16 शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत असून त्या दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. 16 शाळांतील मिळून एकूण 35 वर्गखोल्या धोकादायक आहेत. असा अहवाल तयार करुन शिक्षणखात्याने दुरुस्तीसाठी निधी मंजुरीसाठी पाठवला आहे. यापैकी गर्लगुंजी व मुडेवाडी गावातील शाळांच्या इमारती जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून समुदार भवन व मंदिरात वर्ग भरवले जात आहेत.
कर्नाटक उच्च न्यायालय सेवा प्राधिकारण समितीच्या आदेशानुसार बेळगाव जिल्हा न्यायालय प्राधिकारण समितीच्यावतीने खानापूर तालुक्यातील पडझड व दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या शाळांची पाहणी करण्यात आली. खानापूर न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यनारायण प्राधिकारणचे सेक्रेटरी बेळगाव न्यायालयाचे न्यायाधीश मुरलीमनोहर रेड्डी, खानापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष आय. आर. घाडी, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांनी गर्लगुंजी, तोपिनकट्टी, मुडेवाडी, बरगाव या गावातील पावसामुळे पडझड झालेल्या शाळांची पाहणी केली. पडझडीचा अहवाल कर्नाटक उच्च न्यायालयाच्या प्राधिकरणाला देण्यात येणार आहे. शासनाकडून पडझड झालेल्या शाळांच्या नवीन इमारती बांधण्याच्या सूचना तसेच पाठपुरावा या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे न्यायाधिश व प्राधिकरणचे सेक्रेटरी मुरलीमनोहर रेड्डी यांनी सांगितले.
तालुक्यातील इतर शाळांच्या समस्यांचा अहवाल गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांना तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या काही दिवसात अहवाल उच्च न्यायालयाच्या सेवा प्राधिकरणाला पाठवण्यात येणार आहे.
खानापूर तालुक्यातील धोकादायक इमारती
दुरुस्तीच्या प्रतीक्षेतील शाळा पर्यायी व्यवस्था
1. के.एच.पी.एच. मुगळीहाळ दुसर्या वर्गात व्यवस्था
2. एम. बी. एस. गर्लगुंजी समुदाय भवन
3. एम. एल. पी. एस. मुडेवाडी समुदाय भवन
4. एम. एल.पी.एस. सिंगीनकोप के.एल.पी.एस. सिंगीनकोप
5. एम. एल. पी. एस. कौंदल दुसर्या वर्गात व्यवस्था
6. के. एच. पी. एच. नंदगड दुसर्या वर्गात व्यवस्था
7. के. एल. पी.एस. कळसनट्टी दुसर्या वर्गात व्यवस्था
8. के. एच. पी. जी. एच इटगी दुसर्या वर्गात व्यवस्था
9. के. एल. पी. एस. बेडरहट्टी दुसर्या वर्गात व्यवस्था
10. के. एच.पी. एच.बोगूर दुसर्या वर्गात व्यवस्था
11. के. एल. पी. एस.होस लिंगनमठ त्याचठिकाणी
12. के. एच. पी. एच.बिडी दुसर्या वर्गात व्यवस्था
13. एम.एल.पी. एस. बांबर्डा समुदाय भवन
14.एम. एल. पी. एस. ढोकेगाळी दुसर्या वर्गात व्यवस्था
15. एम. एल. पी. एस. कौंदल दुसर्या वर्गात व्यवस्था
16. एम. एल. पी. एस. गंगवळ दुसर्या वर्गात व्यवस्था
नुकसानीचा अहवाल
जिल्हा कायदा सेवा समितीतर्फे गर्लगुंजी, बरगाव, मुुडेवाडी, तोपिनकट्टी शाळांची पाहणी केली. नुकसानीचा अहवाल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा शिक्षणाधिकार्यांना पाठविण्यात येणार आहे.
खानापूर तालुक्यातील सरकारी शाळांची पाहणी करुन अहवाल बनवण्यात आला आहे. 16 शाळांच्या इमारतीमधील 35 वर्गखोल्या तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे. त्यासाठी निधी आवश्यक असून पाठपुरावा करत आहे.
– लक्ष्मण यकुंडी, गटशिक्षणाधिकारी खानापूर