बेळगाव : बेळगुंदी भागात रोपलागवड जोमात | पुढारी

बेळगाव : बेळगुंदी भागात रोपलागवड जोमात

बेळगुंदी; पुढारी वृत्तसेवा : पुरेसा पाऊस झाल्याने बेळगुंदी आणि परिसरामध्ये भात रोप लागवड जोमात सुरू आहे. सध्या शेतकर्‍यांना मजुरांचा तुटवडा भासत आहे. मजूर मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतीकामांना वेग आला आहे.

बेळगुंदी परिसरामध्ये यापूर्वी भात पिकाची पेरणी करण्यात येत असे. परंतु, अलीकडे पूर्णपणे भातरोप लागवड करण्यात येत आहे. मागील वीस वर्षांमध्ये यामध्ये बदल झाला आहे. आता शंभर टक्के भात रोप लागवड करण्यात येत आहे.

भात रोप लागवडीमुळे उत्पादनात वाढ होत असल्याचे शेतकर्‍यांना आढळून आले आहे. त्याचबरोबर मजुरांची संख्यादेखील कमी लागते. भांगलण, कोरपणी व इतर आंतरमशागतीचा खर्च कमी लागतो. यामुळे भात रोपलागवडीच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे.
मागील पंधरा दिवसांपासून झालेल्या संततधार पावसाने शिवारामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. शेतकर्‍यांची भात रोप लागवडीची धांदल सुरू झाली आहे. शिवारे शेतकर्‍यांनी भरून गेली आहेत. या भागात वेगवेगळी पिके घेण्यात येतात. परंतु सर्वाधिक क्षेत्र हे भाताचे आहे. त्यामुळे रोपलागवडीसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने शेतकर्‍यांची लगबग वाढली आहे. शेतकर्‍यांकडून लवकरात लवकर शेतीची कामे उरकून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

नाचणी घालणीची कामे शिल्लक
या भागात भातासह नाचणीचे पीकदेखील मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. परंतु, नाचणी पिकाची अद्याप वाढ झाली नसल्याने घालणीची कामे लांबली आहे. येत्या काळात नाचणी पिकाच्या घालणीची कामे जोमात सुरू होणार आहेत. रताळी वेलांची चांगल्या प्रकारे झाली आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे.

Back to top button